महापालिकेच्या वडाळा गावातील शाळा क्रमांक १८ मध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात विद्यार्थिनींना भ्रमणध्वनीत अश्लील छायाचित्र दाखविणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.
पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध विनयभंग व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळा गावातील महापालिकेच्या शाळेत सप्टेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकविणारा मुश्ताक शेख विद्यार्थिनींना जवळ बोलावून आपल्या भ्रमणध्वनीद्वारे अश्लील छायाचित्र दाखवीत असे. यामुळे त्रस्तावलेल्या काही जणींनी पालकांना माहिती दिली.
पालकांनी शनिवारी या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुश्ताक शेखला अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.