शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवण्यासाठी आवश्यक त्या साधनसामग्रीची जमवाजमव करण्यात गुरुजी गुरुवारी मग्न होते.
शिक्षकदिनानिमित्त अनेक शाळांमध्ये कार्यक्रम घेतले जातात, मात्र एकाच दिवशी दोन कार्यक्रम घेण्याऐवजी शिक्षकदिनाला फाटा देऊन पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवण्याची तयारी बहुतांश ठिकाणी गेले काही दिवस सुरू आहे. जिल्हय़ात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत २ हजार ४९२ शाळा आहेत. यात ४ लाख १६ हजार ५२१ विद्यार्थी शिक्षण घेतात. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे व विभागीय उपसंचालक व्ही. के. खांडके यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बठक घेऊन शाळांमध्ये दूरदर्शन संच, रेडिओ व जनित्राची व्यवस्था उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. जिल्हय़ातील १ हजार ६९२ शाळांमध्ये दूरदर्शन संच, तर ८०० शाळांमध्ये रेडिओची व्यवस्था केली आहे.
जि.प. शाळांसह खासगी शाळांतही याची व्यवस्था केली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या अधिक आहे व मोठय़ा हॉलची सोय नाही, त्यांच्यासमोर मात्र एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना भाषण कसे ऐकवायचे, हा पेच आहे. त्यामुळे काही वर्गात टीव्हीची सोय करून व काही वर्गात रेडिओवर भाषण ऐकवले जाईल व त्याची ध्वनिफीत दुसऱ्या दिवशी उर्वरित विद्यार्थ्यांना ऐकवली जाणार आहे. शहरातील केशवराज, राजस्थान, देशी केंद्र विद्यालये, गोदावरी लाहोटी कन्याशाळा, वाले इंग्लिश स्कूल यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सर्व विद्यार्थी एकत्र बसू शकतील, अशा हॉलची सोय नाही. शिवाय छोटय़ा टीव्हीवर सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी पाहता येणार नाही. तसेच बहुतेक शाळांत प्रोजेक्टरची सोय उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना दूरदर्शन, काहींना रेडिओची सोय केली जाईल. काही शाळांनी वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांसाठी सोय केली आहे.
डी. एन. केंद्रे, गोिवद घार यांनी आपल्या संस्थेतील शाळांमध्ये भाषण ऐकवण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले. माजी मुख्याध्यापक वसंतराव पाटील यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना भाषण ऐकवले जाणार असून, दुसऱ्या दिवशी सर्वाना त्यांच्या भाषणाची लिखित प्रत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. कृपासदन इंग्लिश स्कूलमध्ये मात्र शिक्षकदिनानिमित्त शाळेला दुपारनंतर सुटी दिली आहे.
दरम्यान, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी भाषण दाखवण्याच्या सक्तीला पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे म्हटले आहे. खासगी शाळा बहुतांश काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या आहेत.
पंतप्रधानांचे ‘दर्शन’  वीजप्रश्नामुळे दुर्लभ!
वार्ताहर, िहगोली
शिक्षणदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शालेय विद्यार्थ्यांना ऐकविणे बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले. मात्र, हा सरकारी कार्यक्रम असल्याने तो टाळता येणार नाही, तसेच जिल्ह्याच्या अनेक शाळांमध्ये वीजपुरवठा, बसण्यास पुरेशी जागा, शाळेचे वेळापत्रक या कारणांमुळे मोदींचे भाषण शिक्षकांची डोकेदुखी बनले आहे.
जिल्ह्यातील १ हजार २०४ शाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी आहेत. पकी भाषण ऐकण्यास किती विद्यार्थी उपस्थित होते, ही माहिती कळविण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या शिक्षकांनी ज्या शाळेत वीजपुरवठा व्यवस्थित नाही, तेथे जनित्राच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सुमारे ३०० पेक्षा जास्त शाळांत वीजपुरवठा नाही. त्यामुळे तेथील संगणक धूळखात पडले आहेत, काही शाळांत नाममात्र टीव्ही खरेदीच्या नोंदी आहेत. शिवाय टीव्ही, संगणक नादुरुस्त आहेत.
ग्रामीण भागातील शाळा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत भरतात, तर शहरी भागात सकाळी ७ ते दुपारी १२ व १२ ते संध्याकाळी ५ अशा प्रकारे भरविल्या जातात. पंतप्रधानांचे भाषण दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक तर बस अथवा सायकल किंवा पायी प्रवास करीत शाळेत यावे लागेल. भाषण संपल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी सायंकाळी उशिरा गावाकडे सुखरूप कसे जातील, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. या बाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता ज्या शाळेत संगणक सुविधा नसेल, तेथे सरपंचांनी दूरचित्रवाणी संच आणून भाषण ऐकवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीजपुरवठा नसेल अशा अतिदुर्गम भागात रेडिओवरून भाषण ऐकविण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगण्यात आले.