संसर्ग रोखण्यासाठी एक लाख ८० हजार नागरिकांचे सर्वेक्षण

पालघर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून तारापूर औद्योगिक वसाहत परिसरातील गावांतील एक लाख ८० हजार नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी तपासणी आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमात ठेवण्यात आले आहे.

बोईसर आणि परिसरातील आठ ते दहा ग्रामपंचायतींमध्ये तीन ते चार आठवडय़ांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या भागांत ताप निदान केंद्र तसेच मध्यवर्ती तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी तपासणीसाठी नागरिक पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे.

बोईसर, दांडीपाडा, सरावली, खैरेपाडा आणि पास्थळ या गावांत पहिल्या टप्प्यात सुमारे ४०० जिल्हा परिषद शिक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाला रोज मुखपट्टी, हातमोजे आणि जंतुनाशकांचा पुरवठा केला जात आहे.

सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या गावांसह सालवड, पाम, टेंभी, कुंभवली, कोलवडे, बेटेगाव आणि मान या परिसरांतील गावांत ५३ हजार घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार असून ते तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

‘टीमा’ तपासणी केंद्रात गर्दी

बोईसरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमा कार्यालयात तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी तपासणीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. आजाराची लक्षणे असणाऱ्या नागरिकांची प्रतिजन चाचणी, तर करोना संसर्ग झालेल्या जोखीम वर्गातील व्यक्तींची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येत आहे.

जबाबदारी काय?

* शिक्षकांनी घराघरांत जाऊन कुटुंबांतील सदस्यांची माहिती घेणे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, रक्तदाब वा इतर आजार असल्याची माहिती संकलित करायची आहे. करोना आजाराची लक्षणे असल्यास संबंधितांना जवळच्या ताप निदान केंद्रात वा चाचणी केंद्रात पाठविण्यासाठी जागृती करणे अपेक्षित आहे.

* यापूर्वी असे सर्वेक्षण आशाताई व अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात आले होते, मात्र नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद लाभत असल्याने या कामी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना कार्य केल्याची माहिती कोविड -१९ उपचार बोईसर विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. गणेश पांचाळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही करा..

शिक्षकांना सर्वेक्षणासाठी नेमणूक दिली जात असताना ५० हून अधिक वयाच्या आणि दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांना या सर्वेक्षणातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी नेमून दिलेले परिसर हे ठळकपणे नोंदविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गोंधळात भर पडण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे पर्यवेक्षक व तंत्रस्नेही म्हणून नेमणूक होणे अपेक्षित असताना विविध संघटनांचे पदाधिकारी शिक्षक आणि मर्जीतल्या शिक्षकांना निवडण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.