शिक्षक रात्रभर रस्त्यावर, शिक्षणमंत्री मुंबईत

नागपूर : जोपर्यंत शिक्षणमंत्री येणार नाही, तोपर्यंत  रस्त्यावरून हटणार नाही, असा पवित्रा घेत विधानभवनावर मंगळवारी दुपारी धडकलेला राज्यभरातील अनुदानित शाळेतील शिक्षकांचा मोर्चा रात्रभर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रतीक्षेत मोर्चास्थळी ठाण मांडून बसला होता. मात्र, शिक्षणमंत्री मोर्चाकडे न फिरकता मुंबईला गेले.

वीस टक्के अनुदानप्राप्त शाळांना नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी ‘सेवाग्राम ते विधानभवन’ अशी पदयात्रा मंगळवारी दुपारी विधानभवनावर धडकली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी यावे, अशी त्यांची मागणी होती. परंतु मंगळवारी अधिकारी वा मंत्री मोर्चाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे  रात्रभर शिक्षक रस्त्यावर  ठाण मांडून बसले होते. यात शिक्षिकांचाही समावेश होता. रात्री काही वेळ हलका पाऊसही झाला. मात्र शिक्षकांनी जागा सोडली नाही. बुधवारी शिक्षणमंत्री मोर्चासमोर भेटीला येतील, अशी अपेक्षा मोर्चेकरी शिक्षकांना होती. मात्र, तावडे मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे  जोपर्यंत शिक्षणमंत्री येणार नाही तोपर्यंत हटायचे नाही, अशी भूमिका घेत शिक्षक बुधवारी दिवसभर रस्त्यावरच  ठाण मांडून बसले होते. मोर्चेक ऱ्यांची भोजनाची व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यात आली.

दरम्यान, दुपारी आमदार नागो गाणार, कपिल पाटील, विक्रम काळे हे तीन शिक्षक आमदार मोर्चासमोर आले आणि त्यांनी सभागृहात  शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते.

साफेलकरच्या सहभागाने आश्चर्य

या शिक्षकांच्या मोर्चाकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे फिरकले नाहीत, मात्र कुख्यात गुन्हेगार  रणजित सफेलकर दुपारी मोर्चात सहभागी झाला आणि त्याने  शिक्षकांनाही संबोधित केले. मंत्र्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळातही त्याचा समावेश होता.

राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर बसले असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे मुंबईला गेले आहेत. २० टक्के अनुदानप्राप्त शाळांना नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतला तर हजारो शिक्षकांना न्याय मिळेल. विनोद तावडे जोपर्यंत मोर्चासमोर येत नाही तोपर्यंत हटणार नाही.’’

– खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, शिक्षक संघटना