संच मान्यता देऊन नवीन निकषानुसार हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. या विरोधात रायगडातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेवर धडकला . रायगड जिल्ह्य़ाच्या माध्यमिक शिक्षण विभागात ३८३ शिक्षक तर ५९२ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ९७५ शिक्षक कर्मचारी अतिरिक्त आहेत. प्राथमिक विभागात अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन निकषानुसार संच मान्यता देवून महाराष्ट्रातील सुमारे ४५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. अतिरिक्त ठरवणाऱ्या कायद्यात बदल करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे यासाठी महाराष्ट्रातील संस्थाचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संयुक्त आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीचे नेते टी. टी. डी. एफ.चे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष नरसु पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेवर रायगडातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला.
शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा पािठबा
रायगड जिल्ह्य़ातील माध्यमिक शाळांत कार्यरत असणाऱ्या विविध शिक्षक संघटनांनी शासनाच्या शिक्षण विभागाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध शाळा बंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. माध्यमिक शाळांत कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या सेवेचा प्राश्न अस्थिर झालेला आहे. याबाबतीत संघटित होऊन लढा देणे व निषेध नोंदविणे गरजेचे आहेच. शिक्षक संघटनांनी निर्णय घेऊन केलेल्या या शाळा बंद आंदोलनास रायगड जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठिंबा मिळाला असून आजच्या मोर्चात शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले होते.
दरम्यान शाळांनी लाक्षणिक बंद पाळावा असे आवाहन आंदोलक संघटनांनी केले होते. या आवाहनाला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही, जिल्ह्य़ातील माध्यमिक शाळांचे कामकाज सुरळीत सुरू होते, असा दावा शिक्षण विभागातर्फे करण्यात आला आहे.