लोहारा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका शिक्षकाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केल्याचं समोर आलं आहे. या पार्टीमध्ये फिजिकल डिस्टंसिंग न पाळल्याप्रकरणी नगराध्यक्षपती, उपनगराध्यक्षासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास लोहारा पोलिसांनी केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फिजिकल डिस्टंसिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतू याकडे प्रतिष्ठित व जबाबदार नागरिकच दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संचारबंदीचे उलंघन करणाऱ्यांविरूध्द पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील गोपाळ संदिकर यांच्या शेतात काही नागरिक संचारबंदीचे उलंघन करत पार्टी (जेवण) करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी संदिकर यांच्या शेतात गेले. फिजिकल डिस्टंसिंग न ठेवता एकत्र येत जेवण करत असताना लोहाराचे उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगराध्यक्ष पती दीपक मुळे, नगरसेवक पती हरी लोखंडे, गोपाळ संदीकर, माणिक चिकटे, प्रभाकर बिराजदार हे सापडले. त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक चौरे, हवालदार अनिल बोदनवाड, मनोज जगताप, विवेक शेवाळे यांनी कारवाई केली.

कारवाई मोजक्या लोकांवरच!

एका शिक्षक मित्राच्या वाढदिवसानिमित्त ही मेजवानी आयोजित केल्याची चर्चा लोहारा शहरात दिवसभर होती. यावेळी एकूण १५ ते २० जण उपस्थित होते, अशीही चर्चा आहे. यात दोन शिक्षकसुद्धा होते. मात्र, पोलिसांनी काही लोकांवरच कारवाई कशी काय केली? ‘त्या’ दोन शिक्षकांना कसे सोडण्यात आले? यावेळी असलेली कार पोलिसांनी जप्त का केली नाही? अशी चर्चा शहरात होती.