शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नागपूर येथे मोर्चा

राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली ८ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे .
जुनीच पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील शाळांच्या वेळा, कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांचे प्रश्न, विनाअनुदानित शाळांचे अनुदान, पायाभूत पदे , शिक्षकेतरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, ग्रंथपालांना बी. एड्. वेतनश्रेणी, ६ वी ते ८ वीच्या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी, कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी, मुख्याध्यापकांना केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी, आंतरजिल्हा बदली प्रकरणे विनाअट निकाली काढावी २० पटाच्या आतील शाळा बंद करू नयेत, शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करावीत, मध्यान्ह भोजन योजनेतून मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मुक्तता करावी.
या महत्त्वाच्या प्रश्नांसह प्राथमिक-माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी महाविद्यालय आश्रमशाळा तंत्रशिक्षण तसेच सनिकी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे विविध प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्यासाठी शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
या सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्य सरकारला जाब विचारण्यात येणार असून त्या सर्व मान्य कराव्यात, असा आग्रह या मोर्चाच्या माध्यमातून धरला जाणार आहे.
शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते, आमदार नागो गोणार विधिमंडळात तर शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, आ. भगवान साळुंखे, कोषाध्यक्ष किरण भावठणकर संघटनमंत्री जनार्दन ठाकूर, सुनील पंडित, पूजा चौधरी सभागृहाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत.
शिक्षकांनी या मोर्चात सहभागी होऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन शिक्षक परिषदेचे राज्य प्रतिनिधी राजेश सुर्वे यांनी केले आहे.