उन्हाळी सुट्टय़ांचा परिवारासोबत आनंद घेण्याऐवजी स्वत:चे पद शाबूत ठेवण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण भटकत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
नव्या शैक्षणिक वर्षांला १५ जून रोजी प्रारंभ होणार आहे. १ मे रोजी उन्हाळी सुट्ट्य़ा लागल्यानंतर जिल्ह्यातल्या अनेक खासगी प्राथमिक शाळातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला आहे. शिक्षणाचा मोफत बाल हक्क कायदा लागू झाला खरा, पण याच नियमानुसार शिक्षकांची पदे मंजूर झाली नाहीत. परिणामी स्वत:चे पद शाबूत ठेवण्यासाठी आता शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.
नांदेड शहरात अनेक छोटय़ा-मोठय़ा प्राथमिक शाळा आहेत त्यापकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळांमध्येच आवश्यक ती विद्यार्थिसंख्या आहे. उर्वरित शाळांमधील शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या शोधात ग्रामीण भाग िपजून काढत आहेत. इंग्रजी माध्यमांचे लागलेले वेड, काही शाळांकडून प्रवेशासाठी मिळणारे आमिष या पाश्र्वभूमीवर अनेक शाळांमधील शिक्षकांची विद्यार्थी जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. यंदा जुन्या नियमानुसारच शिक्षक संचमान्यता होणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक वर्गात ३०-३५ विद्यार्थी संख्या असावी यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे.
उन्हाळी सुट्टय़ा ही शिक्षकांसाठी पर्वणी असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या आग्रहामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टय़ांवर पाणी फेरले गेले आहे. काळे यांनी आनंददायी उपक्रम सुरू केल्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद शाळा सकाळी ८ ते १० या वेळेत भरत आहेत. यासाठी शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकीकडे जिल्हा परिषद शिक्षकांची ही अवस्था असताना दुसरीकडे खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात आपली उन्हाळी सुट्टी घालवत आहेत. जिल्ह्यातल्या माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यांतील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची पुरेशी सोय नाही. यासाठी नांदेड शहरातल्या खासगी शाळांतील शिक्षक या भागात विद्यार्थ्यांच्या शोधासाठी वणवण भटकत आहेत. आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी मोफत गणवेश, निवासाची सुविधा, जादा तासिकांचे आमिष देण्यात येत आहे.