चिंतेचा विषय झालेली राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी शिक्षकांनी पेलण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी, शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सुधारण्याची सूचना केली. ते जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी बोलत होते.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. डॉ.सुधीर तांबे, आ. विक्रम काळे, आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार पांडुरंग अभंग व चंद्रशेखर कदम, जि.प. उपाध्यक्ष राजश्री घुले आदी उपस्थित होते.

पवार यांनी विनोदी शैलीत माध्यमिक शिक्षकांची फिरकी घेत त्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच संस्था गटतटापासून मुक्त ठेवल्यास उज्वल भवितव्य राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी संस्थेचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांच्या कार्याचे कौतुक केले. आपण शिक्षण खाते सांभाळले असल्याने ते किती अवघड आहे, याची जाणीव आहे, शिक्षक, त्यांच्या संघटना, शिष्टमंडळे यांचे ऐकून घ्यावेच लागते, बजेट मात्र तोकडेच असते, जे हे खाते सांभाळतात त्यांची मला दया येते, असाही उल्लेख त्यांनी केला.

पवार म्हणाले, शिक्षकांच्या आर्थिक संकटात आधार देणारी ही संस्था राज्यातील इतर पगारदार संस्थांसाठी मार्गदशर्क ठरत आहे. सामान्य घटकाला आर्थिक पाठबळ देण्याचे काम सहकार क्षेत्राने केले. मात्र शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेची चर्चा आजही होत आहे. गुणवत्ता सुधारण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. नवा समाज निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.

पालकमंत्री शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील अवमेळ लवकरच दूर होईल, असे सांगितले. विखे, आ. काळे, आ. तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणामुळे निर्माण होणारा भूकंपही पवार यांनी आता हाताळावा अशी मागणी केली. पवार यांच्या हस्ते सोसायटीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.कचरे व सुरेश मिसाळ यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी केले.

गुरुजींमुळे मान खाली

नगरमध्ये आज गुरु जींनी (प्राथमिक शिक्षक) जे काही केले, त्यामुळे राज्यात नगरची मान खाली गेली, हे काही चांगले लक्षण नाही असे स्पष्ट मत पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले. माध्यमिक सोसायटीने जामखेडला शाखा सुरू करावी अशी सूचनाही त्यांनी केली.