विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतानाच समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित शिक्षक दिनाच्या पुरस्कार वितरण सोहळय़ात बोलताना केले.

यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णाजी सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी राम गारकर, संजय डोर्लीकर उपस्थित होते. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरू असतो, तसाच समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचेही शिक्षण मोलाचे कार्य करीत असल्याने पूर्वी शिक्षकाकडे समाज सुधारक म्हणून बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन होता. त्याच भावनेतून आताही शिक्षकांनी कार्य केल्यास देशाला आकार देण्यात मोठे योगदान शिक्षकांचे राहील असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आदर्श निर्माण होईल अशा पध्दतीने चंद्रपूर जिल्हय़ातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मुलभूत व भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सहा हजार शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यामुळे पुढील वर्षी सर्व सहा हजार शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शंकर आत्राम, बाबुराव डोंगरवार, ज्योती लहामगे, अनंता भोयर, सिमा भसारकर, आकाश झाडे, मंजूषा साखरकर, रवींद्र उरकुडे, मधुकर वाटेकर, विलास सावसाकडे, हिशोद तुरे, बंडू डाखरे, बाबा कोडापे, कविराव मानकर व भाऊराव तुमडे या जिल्हा परिषदेच्या १५ प्राथमिक शिक्षकांचा तर माध्यमिक शिक्षिका संगीता घोडेस्वार या सर्वाना २०१७-१८ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या २४ शाळांना आयएसओ नामांकन मिळाले असून त्यापैकी प्राथमिक स्वरूपात तीन शाळेतील शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

गडचिरोली जिल्हा परिषदेत नऊ आदर्श शिक्षकांना पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर उपस्थित होत्या. नऊ शिक्षकांमध्ये खुशाल चुधरी, मोतीराम वैरागडे, तुकाराम दडगेलवार, प्रकाश जुवारे, दिवाकर मादेशी, मीना दवंडे, दिलीप नाकाडे, यादव शेंडे, उत्तम म्हशाखेत्री यांचा तर प्रोत्साहनपर बक्षिस पात्र साईनाथ सोनटक्के, योगराज टेभूर्णे या शिक्षकांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.