बेमुदत उपोषण सुरू

नागपूर : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांना शिक्षणमंत्री विनोद तावडे भेटण्यासाठी न आल्याने मोर्चेकरी संतापले असून त्यांनी यशवंत स्टेडियममध्ये बेमुदत उपोषण सुरू केले.  दरम्यान, तिसऱ्या दिवशी मोर्चामध्ये कुख्यात गुन्हेगार रणजित सफेलकरासोबत भाजपचे आमदार नागो गाणार सहभागी झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

२० टक्के अनुदानप्राप्त शाळांना नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षकांनी  महाराष्ट्र विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली ‘सेवाग्राम ते विधानभवन’ पदयात्रा काढली. ती मंगळवारी दुपारी विधान भवनावर धडकली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी यावे, अशी शिक्षकांची मागणी होती, परंतु गेल्या तीन दिवसांपासून तावडे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी मोर्चाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शिक्षक रस्त्यावर  ठाण मांडून बसले होते.

यात शिक्षिकांचाही समावेश होता. आजही तावडे मोर्चापुढे आले नाही. त्यामुळे शिक्षक आक्रमक झाले आणि तावडेंच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलन मागे घेतले नाही, तर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी धमकी सरकारकडून देण्यात आल्यामुळे शिक्षकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान,  शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मोर्चात सहभागी होऊन  शिक्षकांची चर्चा केली. मी तुमच्यासोबत यशवंत स्टेडियममध्ये  उपोषणाला बसतो, असे सांगत शिक्षकांना शांत केले. अखेर शिक्षकांनी स्टेडियम परिसरात  उपोषण करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही आणि शिक्षणमंत्री भेट देऊन चर्चा करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला.

प्रश्न लवकरच सोडवू, शिक्षण मंत्र्यांचे निवेदन

राज्यातील कायम शब्द वगळण्यात आल्यानंतर अनुदानास पात्र घोषित केलेल्या विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तुकडय़ांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर अनुदानास पात्र शाळांना आणि तुकडय़ांना २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत, शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे  शिक्षक संघटनांनी आंदोलन त्यांनी मागे घ्यावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी विधान परिषदेत निवेदन करताना केले.

राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर बसले असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे बुधवारी  मुंबईला गेले होते. आज नागपुरात असताना त्यांनी मोर्चेक ऱ्यांसमोर येऊन शिक्षकांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, ते विधानभवनात बसून राहिले. सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे  यशवंत स्टेडियम परिसरात आमरण उपोषण करणार आहोत.

 -खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विनाअनुदानित शाळा कृती समिती.