२०० शेतकरी विम्यापासून वंचित

पालघर : यंदाच्या हंगामामध्ये चिकू विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बागेचे जिओ टॅगिंग करणे तसेच जमिनीची कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेत २०० हून अधिक शेतकऱ्यांना त्याची झळ पोहोचली आहे.

चिकू पिकाच्या विम्यासाठी जिल्ह्य़ात एका नवीन विमा कंपनीला शासनाने नेमले आहे. अर्जदाराने आपल्या बागेचे जिओ टॅगिंग करून प्रत्यक्ष स्थळावरील छायाचित्र त्याचप्रमाणे जमिनीचे सातबारा, आधारकार्ड व बँकेचे खातेपुस्तक हेदेखील संकेतस्थळावर अपलोड करणे अपेक्षित आहे. जमिनीची कागदपत्रे व माहिती अपलोड करताना काही गावांचा व नगर परिषद हद्दीमधील शेतजमिनीचा उल्लेख या संकेतस्थळावर दिसून येत नाही, तर काही ठिकाणी गट क्रमांक किंवा सव्‍‌र्हे क्रमांक संकेतस्थळावर स्वीकारले जात नसल्याचे दिसून आले आहे.  नवीन व जुने जमीन क्रमांक अपलोड होत नाहीत.   या संदर्भात विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचा अजूनही विमा पूर्णत: निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपनीने १५ जुलैपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेळमर्यादा दिली असून होणाऱ्या तांत्रिक माहितीसंदर्भात जिल्हा कृषी विभागाला कळविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारच्या अडचणी आल्या होत्या व त्यांना सोडवण्यास विमा कंपनी व कृषी विभागाला नंतर यश आले होते. जिल्ह्य़ातील कोणताही शेतकरी विमा कवचापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे तरकसे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.