‘मातृदेवा, पितृदेवा, गुरूदेवो भव’ या त्रिसूत्रीची आठवण करून देत माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंग यांनी तरुणाईला दिलेली हाक आणि अपंग असूनही एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांनी जागवलेल्या प्रेरणादायक आठवणींनी येथील पी.आर.पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिटय़ूटमधील ‘टेकलॉन्स २०१५’चा दिमाखदार सोहळ्यात सोमवारी प्रारंभ झाला.
लक्ष्य साध्य होईपर्यंत कर्म करत रहा, थांबू नका हा महामंत्र स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला होता. प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टी समोर ठेवून काम केल्यास यशप्राप्ती नक्कीच होते, असे अरुणिमा सिन्हा यांनी सांगितले. त्यांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचा चित्तथरारक अनुभव विद्यार्थासमोर मांडला.
रेल्वेतून फेकण्यात आल्यानंतर पाय निकामी झाला, पण दृढसंकल्प समोर ठेवून एव्हरेस्ट शिखर आपण सर केले. स्वत:तील कमकुवतीलाच ताकद बनवा आणि यश मिळवा, असे त्या म्हणाल्या.
मनुष्याच्या जीवनात असलेल्या आश्रमावस्थांची ओळख विद्यार्थ्यांनी ठेवून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेलेली दिसते. त्याचा दुरुपयोग तरुणांनी टाळावा. तासनतास संदेश पाठवणे आणि सोशल साईट्सचा गैरवापर करणे घातक आहे. तरुणाईने नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे वळले पाहिजे, असे विक्रम सिंग म्हणाले.
कार्यक्रमाला पालकमंत्री प्रवीण पोटे, इन्स्टिटय़ूटचे उपाध्यक्ष डी.ए. निंभोरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, संचालक डी.जी. वाकडे, प्रवीण मोहोड, प्राचार्य एस.डी. वाकडे, रामचंद्र पोटे, मोहंमद जुहेर, ए.डब्ल्यू. माहोरे, डी.ए.शहाकार, एस.डी. भुयार आदी उपस्थित होते.