जागतिक बाजारपेठेत सध्या असलेली परिस्थिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचा वेग पाहता या क्षेत्रातीलच नव्हे, तर प्रत्येक उद्योगाला किमान भांडवली गुंतवणूक आणि त्याचबरोबर कमीत कमी शुल्क प्रदान करून अत्याधुनिक वेगवान सेवा मिळविण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे, असे मत परम महासंगणकाचे जनक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे व्यक्त केले.
‘ईएसडीएस’ सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीच्या सातपूर येथील विस्तारित डाटा सेंटरच्या कक्षाचे उद्घाटन तसेच ‘ई मॅजिक’ आणि ‘क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन’ या सेवांचा औपचारिक शुभारंभ सोमवारी भटकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ‘ई मॅजिक’ आणि ‘क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन’ या सेवा ही नव्या युगातील व्यवसायांची गरज उत्तमरीतीने पूर्ण करतील आणि ईएसडीएसचे विस्तारित डाटा सेंटर या सेवांसाठी आवश्यक वेग प्रदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी भटकर यांनी विस्तारित डाटा सेंटरची पाहणी केली. जागतिक दर्जाच्या सुविधा देतानाच पर्यावरण जतनाचे ठेवलेले भान आणि विजेचा पर्याप्त वापर व्हावा याकरिता केलेल्या प्रयत्नांची त्यांनी विशेष दखल घेतली. व्यवस्थापकीय संचालक सोमाणी यांनी कंपनीने डाटा सेंटरचे विस्तारीकरणाचे ध्येय साध्य केल्याचे नमूद केले. बेव होस्टिंगची सर्वोत्तम सेवा सर्व ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेनुसार आणि त्यांच्या बजेटमध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ‘एनलाइट क्लाऊड’पाठोपाठ कार्यान्वित झालेल्या ‘ई मॅजिक’ आणि ‘क्रॉस प्लॅटफॉर्म डिझास्टर रिकव्हरी सोल्युशन्स’ या प्रणाली व्यावसायिकांच्या गरजा तर पूर्ण करतील, शिवाय त्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चातही ९० टक्के बचत होईल, असेही सोमाणी यांनी नमूद केले.