अत्यल्प पावसामुळे नांदेड जिल्हय़ात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात तयार होणारे बाटली व पाकीटबंद (पाऊच) पाणी महागले. या पाश्र्वभूमीवर शेजारच्या तेलंगणा राज्यातील पाकीटबंद पाणी नांदेडच्या सीमावर्ती भागात मोठय़ा प्रमाणात विकले जात आहे. नांदेडमध्ये तयार होणारे पाऊच ८० रुपये शेकडा, तर तेलंगणाचे पाऊच ६५ रुपये शेकडा या दराने विक्री होत आहे.
गेल्या पावसाळय़ात संपूर्ण मराठवाडय़ातच सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला. नांदेड जिल्हय़ात तो केवळ ४४ टक्केच झाला. त्याचे परिणाम नोव्हेंबरपासूनच जाणवू लागले. सरासरीच्या जवळ जाणारा पाऊस होऊनही कंधार, लोहा, मुखेड, बिलोली, देगलूर या भागांत पाणीटंचाई जाणवते. या वर्षी तर टंचाईने अतिशय तीव्र रूप धारण केले. विष्णुपुरीसह सर्वच जलाशयात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड शहरात डिसेंबरपासूनच वीजकपात लागू करण्यात आली. ग्रामीण भागात स्थिती अतिशय वाईट आहे.
जिल्हय़ात सध्या ८०पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसागणिक यात भर पडत असून एप्रिल-मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पाणी पेटण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाची झोप उडाली असून जायकवाडीसह वरच्या भागातील सर्वच जलाशयांनी तळ गाठला आहे. परिणामी कुठूनही पाणी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. शेतीचे पाणी तर केव्हाच बंद करण्यात आले. या स्थितीत नांदेड शहरासह जिल्हय़ात तयार केल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचे दर वाढले आहेत. २० लीटरच्या जारसह २०० ते २५० मिलिलीटरच्या पाऊचपर्यंत भाववाढ आहे.
बारा बाटल्यांचा पाण्याचा बॉक्स पूर्वी ८० रुपयांना होता. त्या वेळी बाटल्यांवर १२ रुपये किंमत छापली होती, तर डिसेंबरपासून हाच बॉक्स १०० रुपयांना झाला. बाटलीवर १६ रुपये छापील किंमत आहे. पाऊचची किंमत ६० रुपये शेकडा होती, ती वाढून आता ८० रुपये झाली. २० लीटरच्या जारमागेही साधारण पाच रुपयांची वाढ झाली. जसजसे ऊन तापू लागेल त्या प्रमाणात हे दर आणखी वाढू शकतात, असे पुरवठादारांचे म्हणणे आहे.
या पाश्र्वभूमीवर तेलंगणा राज्यातून बाटली व पाऊचबंद पाण्याची मोठय़ा प्रमाणात आवक सुरू झाली आहे. नांदेडच्या तुलनेत कमी दराने ही पाणीविक्री होत असल्याने ग्राहकांचीही त्याला चांगली मागणी आहे. देगलूर, बिलोली, धर्माबाद, किनवट या सीमावर्ती तालुक्यांत हे पाणी पोहोचले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने प्रामुख्याने पाऊच सोपे असल्याने ६५ रुपये शेकडा या दराने तेलंगणातील पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. वरचेवर तीव्र होत जाणाऱ्या पाणीटंचाईत सर्वसामान्यांना या पाऊचचा मोठा आधार होईल, अशा प्रतिक्रिया आहेत.