04 March 2021

News Flash

‘तेलुगु’ने ‘मराठी’चा लावलेला वेलू सुकून गेला ..

गणेशोत्सवात होणारी ही बौध्दिक व्याख्यानमाला आता इतिहासजमा झाली आहे.

सलग पन्नास वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या उद्योग बँक व्याख्यानमालेची इतिश्री

शहरातील पूर्व भागात तेलुगु भाषेने मराठी साहित्य व संस्कृतीची अभिरूची वाढविणाऱ्या बौध्दिक व्याख्यानमालेची परंपरा सलग पन्नास वर्षे जोपासली. परंतु गणेशोत्सवात होणारी ही बौध्दिक व्याख्यानमाला आता इतिहासजमा झाली आहे. तेलुगु संस्कृतीने मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा लावलेला आणि वाढविलेला वेलू आता दुर्दैवाने योग्य खतपाणी मिळत नसल्याने सुकून गेला आहे. त्याबद्दलची हळहळ तेलुगुंसह मराठी भाषिक व रसिकांनी व्यक्त केली आहे.

पूर्व भागात सहकार चळवळीच्या माध्यमातून विणकर पद्मशाली समाजाच्या नेत्यांनी पन्नास वर्षांपूर्वी सूतगिरण्या, बँका व इतर प्रकल्प उभारले होते. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांत या सूतगिरण्या, बँका लयास गेल्या असून त्यातून एकूणच पूर्व भागातून लक्ष्मीचा वास लोप पावला आहे. सोलापूर जिल्हा उद्योग सहकारी बँकेच्या वैकुंठभाई मेहता सभागृहात दरवर्षी गणेशोत्सवात न चुकता बौध्दिक व्याख्यानमाला म्हणजे केवळ सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कौतुकाचा विषय होता. शेकडो रसिकांचा प्रतिसाद लाभणाऱ्या या व्याख्यानमालेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गो. नी. दांडेकरांपासून ते विद्याधर गोखले, दाजी पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. अरूण टिकेकर अशा अनेक दिग्गज सारस्वतांनी हजेरी लावून विचारपुष्प गुंफले होते. रसिकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि नामवंत वक्त्यांनी केलेले कौतुक हे या व्याख्यानमालेच ठळक वैशिष्टय़ होते.

२००४ साली सोलापूर जिल्हा उद्योग सहकारी बँक बंद पडली. तेव्हा आपसूकच या व्याख्यानमालेचे भवितव्यही धोक्यात आले होते. परंतु बँक बंद पडली तरी बँकेच्या सेवक मंडळाने हा वारसा सोडला नाही. माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या प्रोत्साहनातून जयप्रकाश पल्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशोत्सवात या व्याख्यानमालेचा वारसा चालवत आणला. गेल्या वर्षी व्याख्यानमालेने पन्नाशी ओलांडली. तेव्हा मात्र पल्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथेच थांबण्याचे ठरविले. त्यानुसार यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात उद्योग बँक व्याख्यानमालेची परंपरा खंडित झाली आहे.

पुरेसे आर्थिक बळ व इतर अडचणींमुळे हा कटू निर्णय घ्यावा लागल्याचे जयप्रकाश पल्ली यांनी सांगितले. व्याख्यानमालेचे वैकुंठभाई मेहता सभागृहही आता जीर्ण झाले आहे. छत धोकादायक असल्यामुळे गेल्या वर्षी शेवटची व्याख्यानमाला डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात घ्यावी लागली होती. रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असला तरी सुमारे दोन लाखांपर्यंत खर्चाची तरतूद करणे अशक्य झाल्यामुळे व्याख्यानमालेला पूर्णविराम दिल्याचे पल्ली यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 1:54 am

Web Title: telugu culture and marathi culture
Next Stories
1 ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे स्वागत
2 पतीला मारहाण करून आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार
3 प्रवीण दिवटे हत्याकांडात ‘ऑफीस बॉय’ला अटक, ८ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी
Just Now!
X