एरवी घामाच्या धारांनी वैतागणारे मुंबईकर सध्या तापमान घसरल्याने चांगलेच गारठले आहेत. मुंबईत यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचा पारा बुधवारी तब्बल ११.६ अंशांवर घसरला. मुंबईत इतिहासातील आतापर्यंतच्या दुसऱया सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे ११.६ अंशांपर्यंत तापमान उतरले आहे, तर कुलाबा येथे १७.८ अंश तापामानाची नोंद झाली आहे. मुंबईसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात गुलाबी थंडीचे वातावरण आहे. निफाडमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये पारा ६ अंशांवर घसरला आहे. औरंगाबादमध्ये १३ अंश तापमान असून, धुळ्यात  ९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्यातही बोचरी थंडी जाणवत आहे. पुण्यात १० अंशांपर्यंत तापमान खाली उतरले आहे.
दरम्यान, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र गारठला असला तरी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये मात्र पारा अद्याप खाली गेलेला नाही. गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा असतो, पण राज्यात सर्वत्र थंडीचे वातावरण असताना महाबळेश्वरमधील तापमान त्यामानाने खाली उतरले नसल्याने पर्यटकांची निराशा झाली आहे.