तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज

अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडायचे असल्यास उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास गेले आहे.

कोरडय़ा वातावरणामुळे १७ ऑक्टोबपर्यंत राज्यातील सर्वच भागांतील कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

कोकण विभागात ३२ ते ३४ अंश, मध्य महाराष्ट्रात ३४ ते ३७, मराठवाडय़ात ३४ ते ३६, तर विदर्भामध्ये ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान कमाल तापमान नोंदवले जात आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या वर नोंदविले जात आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र ते सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात रात्रीही उकाडा जाणवत आहे.

रविवारी सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. मुंबईत ३४ अंश, तर सांताक्रूझ येथे ३५.५ अंश तापमान नोंदविले गेले. मुंबईत किमान तापमानही २५.५ अंशांवर गेल्याने रात्री उकाडा जाणवत आहे.

पुण्याचे कमाल तापमान ३४.२ अंशांपर्यंत पोहोचले. जळगाव, मालेगाव, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ येथे ३५ ते ३७ अंशांपर्यंत तापमान असलेल्या या भागात उन्हाचा कडाका अधिक आहे.