विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र गारठला; नागपूरला नीचांकी ३.५ अंश तापमान

उत्तरेकडील काही भागात बर्फवृष्टी होत असल्याने त्या भागातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांची तीव्रता वाढल्याने संपूर्ण राज्य गारठले आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रालाही थंडीचा तडाखा बसतो आहे. बहुतांश भागातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. नागपूरमध्ये राज्यातील नीचांकी ३.५ अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यासह विविध शहरांमध्ये तापमानाचा पारा मागील दहा ते बारा वर्षांच्या तुलनेत प्रथमच नीचांकी पातळीपर्यंत घसरला. दोन ते तीन दिवस थंडीचा प्रभाव कायम राहणार असून, विदर्भ,  मराठवाडय़ात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

कोकण, मुंबई विभागातील तापमान सरासरीच्या आसपास आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी घट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यात शनिवारी नीचांकी ५.९ अंश तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये ५.१, तर मालेगावमध्ये ५.४ तापमान नोंदविले गेले. मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी तापमान १० अंशाखाली आहे. औरंगाबादचा किमान तापमानाचा पारा ५.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. विर्दभात गारठा अधिक आहे. नागपूरमध्ये ३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत ते ८.८ अंशांनी कमी आहे.

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (कुलाबा) २०.०, सांताक्रुझ १७.६, रत्नागिरी १७.७, पुणे ५.९, जळगाव ६.०, कोल्हापूर १४.२, महाबळेश्वर १०.५, मालेगाव ५.४, नाशिक ५.१,सांगली ११.०, सातारा ९.१, सोलापूर ११.६,उस्मानाबाद ९.१, औरंगाबाद ५.८, परभणी ६.४, नांदेड ७.५, अकोला ५.९, बुलडाणा ७.८,ब्रह्मपुरी ७.०, गोंदिया ६.०, अमरावती ९.६, चंद्रपूर ९.०, यवतमाळ ९.०,वाशिम ८.६, वर्धा ८.४.