राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरात भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे. शिर्डीतही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरावरून टीका केली. “तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे,” असं सांगत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

शिर्डी येथे बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरून टीका केली. पाटील म्हणाले,”आज तर हद्द झाली. राज्यपालांनी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) पत्र लिहिलं. तुम्ही मंदिर का उघडत नाही. संत महंत रस्त्यावर उतरले आहेत. तेव्हा तुम्ही उत्तर देता. मुंबईला पीओके म्हणणाऱ्या कंगनाचं स्वागत करणाऱ्या राज्यपालांनी मला हिंदुत्व शिकवू नये. तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. सुरूवात होते तुमच्या घरापासून… हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हे म्हणायचं तुम्ही टाळलं. माननीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले. हिंमत असेल, तर प्रत्येक भाषाच्या सुरूवातीला हिंदुह्रदयसम्राट म्हणा. का म्हणत नाही तुम्ही. मग कशासाठी म्हणता की माझ्या हिंदुत्वाचा मला दाखला देण्याची आवश्यकता नाही,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

आणखी वाचा- माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना उत्तर

“दारूच्या दुकानात जाऊन करोना होणार नाही, पण मंदिरात जाऊन होणार आहे. तुम्ही सगळं उघडायला लागला आहात. ट्रेन सुरू झाल्या, विमानं सुरू झाली. मला उद्धव ठाकरे यांचं काही कळत नाही. अनेक विषयात मला त्यांच्याबद्दल कळत नाही. असं का चाललं आहे ते. पण, या विषयात बिलकुल कळत नाहीये, त्याचं नेमकं काय म्हणणं आहे. करोना मंदिरात दबा धरून बसलेला आहे आणि परमेश्वराची साधना करायला येणाऱ्यावर तो हल्ला करणार आहे का? ठाकरेंचं म्हणण काय आहे? मंदिरात जाऊन करोनाचा प्रार्दुभाव त्या व्यक्तीला होणार असेल, तर तो दारूच्या दुकानात, बसमध्ये, ट्रेनमध्ये जाऊन होणार नाही. काही कळतच नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.