23 November 2020

News Flash

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना उत्तर

"घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?"

संग्रहित छायाचित्र

राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं होतं. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं असून, “माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं पत्र

माननीय राज्यपालमहोदय,
महाराष्ट्र राज्य यांसी –
जय महाराष्ट्र ,

महोदय

आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का?

आणखी वाचा- बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.
आपण म्हणता गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र .
आपला नम्र –
उद्धव ठाकरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:54 pm

Web Title: temple reopening mandir reopen demand uddhav thackeray reply to governor of maharashtra bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल
2 छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत पंतप्रधान मोदींचं मराठीत भाषण
3 बिहारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?; संजय राऊत यांनी केला खुलासा
Just Now!
X