राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून भाजपानं पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारे लोक आता मंदिरं उघडण्यापासून का दूर जात आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे,” असं म्हणत राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारच्या भूमिका पूर्णपणे बदलल्या आहेत. पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारी लोकं आता मंदिर उघडण्यापासून का दूर जात आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारनं नियमावली बनवून मंदिर उघडणं अपेक्षित होतं, परंतु दुर्देवानं सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही. मंदिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. नियमावली बनवून मंदिरं उघडण्यास काही हरकत नाही, परंतु हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे. लोकांना काय वाटतं यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू, यावर सरकारचा भर असतो. सरकारनं मंदिरं उघडली नाहीत आणि राज्यभर ‘मंदिर खोलो’ आंदोलन सुरू झालं, तर भाजपा त्यांच्यासोबत उभी राहिल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहिल,” असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे

“बेळगावमधील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्या”

सरकारच्या बाहेर राहुन आरडा-ओरड करणं सोपे असते, परंतु सरकारमध्ये गेल्यानंतर त्या विषयातून मार्ग काढण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, ते परिश्रम घेताना हे सरकार दिसत नाही. सरकारच्या बाहेर राहुन तुम्ही यापूर्वी बेळगाव सीमाप्रश्नी टोकाची संघर्षाची भूमिका घेत होतात. मात्र, आता सत्तेत असून सुद्धा याबाबतीत काही निर्णय घेताना दिसत नाही. यावेळी तुम्ही आपली अहंकाराची भावना बाजूला ठेवून बेळगावमधील लोकांना न्याय मिळेल, अशी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा, अशी मागणी दरेकर केली आहे.