लातूरहून सागवानी फळ्या घेऊन कर्नाटकातील रायचूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला आयशर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तीन कामगार जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लातूर-गुलबर्गा रोडवरील माडज शिवारात घडली. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला आहे.
लातूरहून सागवानी फळ्या घेऊन निघालेला आयशर टेम्पो (एमएच 13 – एएन 6956) हा कर्नाटकातील रायचूरच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास लातूर-गुलबर्गा मार्गावरील माडज शिवारात आला असता टेम्पो चालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने टेम्पो उलटला.

या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या 5 कामगाराच्या अंगावर सागवानी फळ्या पडल्या. यात जमाप्पा मल्लप्पा मडीवाल (वय 41), हाणमंत नरसाप्पा मडीवाल (वय 43, दोघे रा. शिंगनोडी, जि. रायचूर (कर्नाटक) व सतीश (पुर्ण नाव नमूद नाही) हे तिघे गुदमरुन जागीच ठार झाले. तर व्ही. वीरभद्रराव (वय 40) आणि एम. तायप्पा (58, दोघे रा. रायचूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले, सहायक फौजदार बालाजी भूमकर, वाल्मिक कोळी, नागनाथ वाघमारे, मनोज दळवी आदींनी अपघातग्रस्तांना उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. त्यातील तिघे मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर दोघा गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उमरगा पोलिसांत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.