कांद्रेभुरे-सरावली रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थी, ग्रामस्थांचे हाल

पालघर : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतानाच सफाळे पश्चिम भागातील कांद्रेभुरे-सरावली रस्त्याचे काम रखडले आहे. गेल्या १० दिवसांपासून दिरंगाईने या रस्त्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरून एसटी बसही धावत नाही. त्याचा फटका या भागांतील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना बसत आहे.

कांद्रेभुरे-सरावली रस्त्याच्या कामात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी आणि ठेकेदार लक्ष घालत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता रखडला आहे. विद्यार्थ्यांसह, चाकरमानी, बागायतदार आणि सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून अरुंद रस्त्यामुळे दहा दिवसांपासून एसटी बस बंद आहेत. परिणामी येथील बारावीच्या आणि आता सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र सरावली येथे रस्त्यावर असलेल्या मोरीच्या कामाला ठेकेदाराकडून दिरंगाई होत आहे. कांद्रेभुरे-सरावली हा रस्ता सुमारे पाच किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी संबंधित काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट केल्याने एसटीसेवा व इतर वाहने येत नाही.

विद्यार्थी, नागरिकांची पायपीट

या भागातून दररोज शेकडो नागरिक तसेच सुमारे सव्वाशे विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात. मात्र आता या रस्त्यावर अडथळा निर्माण होत असल्याने आणि एकेरी वाहतूक शक्य नसल्याने या रस्त्यावरून एसटी नेता येणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि येथील नागरिकांना पायपीट करून घरी परतावे लागते. हा रस्ता एसटीसाठी लवकरात लवकर खुला करून द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

ठेकेदार व अधिकारीवर्गाच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. परिणामी परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना एसटी सेवा नसल्याने गैरसोय झाली आहे. परीक्षा सुरू आहेत हे तरी लक्षात घेऊन हा रस्ता लवकरात लवकर बनवून एसटीसाठी खुला करून घ्यावा. जेणेकरून नागरिकांना एसटी सेवेचा लाभ घेता येईल.

– अशोक नाईक, सदस्य, सरावली ग्रामपंचायत

रस्त्यावर मोरीचे काम सुरू असल्याने एसटी वाहतुकीला अडथळा होत आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे समोरून वाहने आल्यास एकेरी वाहतूक शक्य नाही. गैरसोय लक्षात घेता या रस्त्यावर प्रशिक्षण वाहन आणि कर्मचारी पाठवून एसटी नेता येईल का याविषयी सर्वेक्षण करत आहोत.

– अनिल बेहरे, सफाळे एसटी आगार व्यवस्थापक

रस्त्यावर मोरी बनवण्याचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता दिला आहे. प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करतो.

– जे. पाटील, उपअभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना