राज्यात ऑनलाइन धान्यवाटप प्रणाली लागू झाल्यापासून राज्यभरात जवळपास १० ते १२ लाख बोगस रेशनकार्ड धारकांना चाप लावण्यात आला आहे. ऑनलाइन धान्यवाटप प्रणालीच्या वापरामुळे ३ लाख ७५ हजार मेट्रीक टन धान्याची बचत करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बापट यांनी याबाबत माहिती दिली. गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील पुरवठा विषयक बैठक सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जानेवारी २०१८ पासून राज्यभरात ऑनलाइन धान्यवाटप प्रणालीचा प्रयोग सुरू करण्यात आला होता. यामुळे राज्यभरात जवळपास १० ते १२ लाख बोगस रेशनकार्ड धारकांना चाप लावण्यात आला, कारण ही प्रणाली लागू झाल्यापासून पाच ते सहा महिने ते रेशनकार्ड धारक धान्य घेण्यासाठी आलेच नाहीत, आले नाही म्हणजे ते बोगस होते. त्यामुळे अशा व्यक्तींचं रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन प्रणालीमुळे राज्यभरात ३ लाख ७५ हजार मेट्रीकटन धान्याची बचत झाली आहे. बचत झालेले धान्य गरिब कुटूंबाना अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती गिरीश बापट यांनी यावेळी दिली. तर अनेक दिवसापासून रेशनिंग दुकानदारांचे कमीशन आम्ही ७० रूपयांवरून वाढवून ते १५० रूपये करण्यात आले आहे. याशिवाय रेशन दुकांनदारांना आर्थिक मदत व्हावी यासाठी १३ प्रकारचे पदार्थ विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली असून यात दुध विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र सरकारच्या मालकी असलेले आरे दुधच विक्री करण्याची परवानगी त्यांना असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.