आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला दहा लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांचा दळभार पंढरपुरात दाखल झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या प्रमुख पालख्यांसह शेकडो संतांच्या लहान मोठ्या पालख्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत अवतरल्या आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना अवघ्या पंढरीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे.
सायंकाळी संत ज्ञानदेव व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या अलीकडे वाखरी येथे आगमन झाल्यानंतर तेथे अखेरचे गोल िरगण पार पडले. या वेळी ज्ञानदेव-तुकारामांच्या गजराने वातावरण भारावून गेले. शेकडो किलोमीटर अंतरावरून पायी चालत आलेल्या संतांच्या पालख्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक स्वागत केले. तेथून मुख्यमंत्री फडणवीस काही अंतर पालखी सोहळ्यासोबत चालत पंढरपुरात आले. पालखी सोहळ्यामध्ये सुमारे सहा लाख वारकरी होते. तर पंढरीत एक-दोन दिवस अगोदर चार लाखांपेक्षा वारकरी तथा भाविक दाखल झाले आहेत.
यात्रेच्या काळात चंद्रभागेच्या वाळवंटात तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फटकारे मारत बरेच निबर्ंध लादले आहेत. अखेरच्या क्षणी भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांसाठी वर्षांतून वीस दिवस वाळवंट वापरण्याची मुभा दिली आहे. र्निबधामुळे धार्मिक कार्यक्रम होताना वाळवंटात कोठेही अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी वाळवंटाचा परिसर स्वच्छ दिसत आहे.
एकीकडे वाळवंटात राहुट्या उभारून निवास करण्यास बंदी असल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाळवंटाला लागूनच काही अंतरावर ६५ एकर शासकीय जागेवर वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय केली आहे. त्याठिकाणी सुमारे एक लाख वारकरी निवाऱ्याचा लाभ घेत आहेत.

दहा किलोमीटर रांग
पंढरीत दाखल झालेल्या वारकरी तथा भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा दहा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या आहेत. दर्शन रांगेत गडबड गोंधळ होऊ नये आणि भाविक वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधा वाखाणण्याजोग्या आहेत. दर्शन रांगेत एरव्ही मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. परंतु यंदा दर्शन रांगेत आठ फूट उंचीचा कठडा उभारण्यात आल्यामुळे कोणताही गोंधळ दिसत नाही