अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील एका मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यातून महिलांच्या अंगावर खाज आणणारी पावडर टाकून सुमारे १० लाख रुपये किमतीचे दागिने चोरण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत लहान मुलाचा वापर केला. मध्य प्रदेशातील गुन्हेगारांच्या टोळीचे हे कृत्य असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

अहमदनगर येथील एन. आर. लॉनमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप नागरे यांची पुतणी व सराफ व्यावसायिक अनिल नागरे यांची कन्या सायली व पारनेर येथील अशोक कृष्णनाथ मिसाळ यांचे चिरंजीव प्रतीक यांचा काल विवाह सोहळा होता. दुपारी वैदिक पद्धतीने विवाह झाला. सायंकाळी सात वाजता नेहमीच्या पद्धतीने लग्न लावण्यात आले.

लग्न लागल्यानंतर महिला मंगल कार्यालयात खुर्चीवर बसलेल्या होत्या. यातील जयश्री नागरे, राणी नागरे, अश्विनी नागरे या बसलेल्या असताना पाठीमागे रिकाम्या असलेल्या खुर्चीवर सुटाबुटातील एक मुलगा येऊन बसला. त्याच्या पेहरावावरून तो विवाह सोहळ्यातील कुटुंबातीलच कुणाचातरी मुलगा असावा असे वाटल्यानं कोणी आक्षेप घेतला नाही. या मुलानं जयश्री नागरे यांच्यावर खाज येणारी पावडर टाकली. खाज येऊ लागल्याने जयश्री या उठून स्वच्छतागृहाकडे गेल्या. त्यावेळी त्यांच्या हातातील पर्स जागेवरच राहिली. संधी साधत ही पर्स घेऊन मुलाने पोबारा केला.पर्समध्ये सुमारे २५ तोळे दागिने होते.

चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिलीप नागरे, विजय नागरे, प्रकाश कुलथे, मनोज चिंतामणी, सोमनाथ महाले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी अजिंक्य नागरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील एका दुकानातही अशाच पद्धतीची चोरी झाली होती. ही चोरी मध्य प्रदेशातील गुन्हेगारांनी केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व उपनिरीक्षक पवन सुपनर यांनी घटनास्थळी येऊन मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यामध्ये ही चोरी तिघांनी एका लहान मुलाचा वापर करून केल्याचे निष्पन्न झाले. चोरटे सकाळपासूनच मंगल कार्यालयाबाहेर व आतमध्ये पाहणी करत होते. चोरी करण्यापूर्वी ते मंगल कार्यालयाबाहेर उभे होते. लहान मुलगा चोरी करून आल्यानंतर ते लगेच पसार झाले.