पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहा नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६० झाली आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून २५ जण करोनामुक्त झाले आहेत. बुधवारी दिवसभरात नोंदवलेल्या दहा नवीन रुग्णांपैकी चौघे वसई ग्रामीण भागातील असून पालघर व डहाणू तालुक्यांतून प्रत्येकी तीन नवीन रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात सध्या ३२ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू असून हे रुग्ण बोरसर येथील टीमा रुग्णालय, नालासोपारा येथील सिद्धिविनायक रुग्णालय व मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालघर तालुक्यात आजवर २४ रुग्ण आढळले असून वसई ग्रामीणमध्ये १८, डहाणू तालुक्यात १५ तर वाडा तालुक्यात तीन नागरिकांना करोना संसर्ग झाला आहे.

डहाणू तालुक्यातील सारणी येथील एका वीस वर्षीय तरुणाला करोना झाला आहे. ही व्यक्ती कोलकाता येथून आली होती. तसेच ओदिशा येथून डहाणू येथे स्थलांतरित झालेल्या १८ वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे वाणगाव कोमपाडा येथील राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम विभागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बोईसर काटकरपाडा येथील पाच वर्षीय मुलगा तसेच बोईसर येथील एका २५ वर्षीय तरुणाला श्वसनाचे विकार असल्याने त्यांची चाचणी केली असता त्यांना करोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तारापूर येथील लंडन येथून परतलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाला आजाराने ग्रासले आहे. वसई तालुक्यातील वासळी येथील ८६ वर्षे पुरुष व ८० वर्षीय स्त्री तसेच अर्नाळा येथील ३५ वर्षीय स्त्री आणि ३२ वर्षीय स्त्री या रुग्णाच्या संपर्कात आल्याने करोना चाचणीमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.