24 January 2021

News Flash

भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव

दहा नवजात बालकांचा मृत्यू, मातांच्या आक्रोशाने समाजमन हेलावले

दहा नवजात बालकांचा मृत्यू, मातांच्या आक्रोशाने समाजमन हेलावले

संजय राऊत, लोकसत्ता 

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याने दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तेथील १७ नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ‘आऊटबॉर्न’ आणि ‘इनबॉर्न’ असे दोन कक्ष आहेत. सर्व मृत बालके ‘आऊटबॉर्न’मधील आहेत. त्यातील दोघांचा होरपळून, तर आठ बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला.

या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते आणि आरोग्य उपसंचालक संजय जायसवाल नागपूर येथून रुग्णालयात दाखल झाले. आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.

दुर्घटनेमुळे शनिवारी लगतच्या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच रुग्णालय परिसरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

रुग्णवाहिका चालक मदतीला धावले पण..

अतिदक्षता कक्षातून धूर येताना पाहून सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे आणि शिवम मडावी यांनी राहुल गुप्ता, राजकुमार दहेकर या रुग्णवाहिकाचालकांना मदतीसाठी दूरध्वनी केला. ते चौघेही तत्काळ अतिदक्षता कक्षाबाहेर पोहोचले, परंतु कक्षात आगीचे लोळ आणि धूर होता. ऑक्सिजन सिलिंडर ठेवलेल्या भागात आगीचा भडका उडाला होता. त्याच वेळी स्फोटांचाही आवाज आला, असे त्यांनी सांगितले.

नेमके काय घडले?

पहाटे दोनच्या सुमारास आग लागली तेव्हा बालकांच्या अतिदक्षता कक्षात दोन परिचारिका होत्या. परंतु त्या गाढ झोपेत होत्या. आग भडकल्यानंतर त्यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करत कक्षाबाहेर धाव घेतली. आगीचे लोळ आणि धूर पाहून रुग्णालयाबाहेरील नागरिकही मदतीला धावले. परंतु तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते. दहा कोवळे जीव होरपळून आणि गुदमरून गतप्राण झाले होते. काही बालके पूर्णपणे होरपळली होती. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 4:43 am

Web Title: ten newborns killed in fire at maharashtra government hospital zws 70
Next Stories
1 बोईसर दरोडय़ाप्रकरणी दोघांना अटक
2 बीड जिल्ह्य़ात २६ कावळ्यांचा मृत्यू
3 राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी
Just Now!
X