सांगलीतील शिवाजी क्रीडांगणावर एकाच वेळी दहा हजार विद्यार्थ्यांनी खंडग्रास सूर्यग्रहणाचा नजारा स्वनेत्रांनी अनुभवला. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासह महाराष्ट्र अंधश्रध्दा  निर्मूलन समितीने सूर्यग्रहणाच्या निमित्ताने ‘सूर्योत्सव सांगली’ हा उपक्रम गुरुवारी हाती घेतला होता. एकाच  ठिकाणाहून इतक्या मोठ्या संख्येने सूर्यग्रहण अनुभवण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरली.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी, या उपक्रमामुळे ग्रहणाबाबत असलेल्या अंधश्रध्दा, गरसमज दूर करण्यासाठी मोठी मदत होणार असून असे उपक्रम हाती घेउन मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. या वेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले,की शिक्षण विभाग आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा उपक्रम वैज्ञानिक मूल्य रुजविण्यासाठी फायदेशीर ठरेल. ग्रहण पाळणे ही अंधश्रद्धा आहे. ग्रहणाच्या निरीक्षणामुळे भावी काळात यातील काही संशोधक बनतील. सूर्याला ग्रहण लागलेलं सुटू शकतं, पण मनाला अंधश्रद्धेचं लागलेल ग्रहण सुटायला प्रयत्न करावा लागतो.

या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग म्हणाले,की विद्यार्थ्यांत डोळसपणा वाढवा, शोधकवृत्तीचा विकास व्हावा, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले,की संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक मूल्य रुजविण्यासाठी समिती नेहमीच प्रयत्नशील राहते. निर्भयपणे मुले ग्रहण पाहतात ही प्रेरणादायी, आशावादी बाब आहे. या वेळी ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी ग्रहणाबाबत प्रभावी समालोचन करत खगोल वैज्ञानिक माहिती दिली.

या ग्रहणाच्या पाहण्याने, अनुभवण्याने मुलांच्या मनातील गरसमज दूर होतील.  प्रा. प. रा. आर्डे, डॉ. संजय निटवे, संजय बनसोडे यांनी ग्रहणांची माहिती दिली. राहुल थोरात यांनी आभार मानले. ग्रहणावेळी विद्यार्थ्यांनी खाऊही खाऊन अन्न ग्रहण करू नये या समजाला फाटा दिला. मुलांना सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास चष्म्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पक्षी अभ्यासक पापा पाटील, शरद आपटे, गणेश दातार, श्रीकृष्ण कोरे यांनी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन सूर्यग्रहणावेळी पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनात याचे काय  परिणाम होतात याची माहिती मुलांना दिली. सूर्यग्रहणाच्या मध्यवेळेत पक्षीही सांजवेळ झाली असे समजून झाडाकडे, घरट्याकडे धाव घेत असल्याचे मुलांना दाखवून दिले.