News Flash

वडिलांचं छत्र हरवलेल्या चिमुकल्याचा डोळ्यात पाणी आणणारा निबंध; पप्पा तुम्ही लवकर परत या…

मंगेश चौथीत शिकत आहे

दहा वर्षांचा मंगेश आणि त्यानं लिहिलेला निबंध.

कोवळ्या वयातच डोक्यावरून बापाचं छत्र हिरावलं गेलं. त्यानंतर सगळे बाळहट्ट अर्धवटच राहिले. पुढे काही दिवसांनी या चिमुकल्यावर बापावरच निबंध लिहायची वेळ आली आणि त्यानं लिहिलाही. पण, त्यानं लिहिलेल्या निबंधानं वाचणाऱ्याच्या काळजालाच पाझर फोडला. त्याचा हा निबंध आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मंगेश वाळके. वय दहा वर्ष. बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीतल्या शाळेत मंगेश चौथ्या वर्गात शिकतो. गेल्या महिन्यात मंगेशच्या वडिलांचं क्षयरोगानं (टीबी) निधन झालं. वडिलाच्या दुखातून अजून त्याचं कुटुंब सावरलेलं नाही. अशातच चौथीत असलेल्या मंगेशवर माझे वडील या विषयावर निबंध लिहिण्याची वेळ आली. त्याचा हा निबंध सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मंगेशनं लिहिलेला निबंध –

“माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18ला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या…”

छोट्या निबंधातून दुःखाला दिली वाट –

वडील गेल्यानंतर मंगेशनं स्वतःला होत असलेल्या झालेल्या वेदनांना निबंधातून वाट मोकळी करून दिली. त्याच्या शिक्षिकेनं जेव्हा मंगेशनं लिहिलेला निबंध वाचला, तेव्हा त्यांनाही रडू आवरलं नाही. मंगेशचा हा निबंध सोशल माध्यमातून व्हायरल झाला. त्याचं दुःख वाचून लोकही हळहळ करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 4:23 pm

Web Title: ten year old boy wrote essay on his father bmh 90
Next Stories
1 प्रकाश आंबेडकर यांना भूमिका मांडण्याचा अधिकार -अजित पवार
2 प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकणकड्यावरुन पडून मृत्यू
3 शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल
Just Now!
X