20 November 2019

News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास

अवधूत भागणा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

अलिबाग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. अवधूत भागणा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना एप्रिल आणि मे २०१४ मध्ये मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे घडली होती. पीडित मुलगी तिच्या मामाच्या घरात आईसोबत राहात होती. तर आरोपी हा त्यांच्या घरामागे राहात होता. पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी अवधूत याने जवळीक साधण्यास सरुवात केली होती. अशातच २०१४ मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तो तिच्या घरात शिरला. तिला बळजबरीने घराच्या माळ्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही बाब पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तो चांगला मुलगा असून तू खोटे आरोप करू नकोस असे म्हणत तिलाच गप्प राहण्याचा सल्ला दिला. ही बाब जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी स्वत: या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपी अवधूत विरोधात भादवी कलम ३७६ आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.  या प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात झाली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम मोहिते यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. यावेळी शासकीय अभिव्योक्ता म्हणून अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी महिला पोलीस अधिकारी, मनीषा जाधव आणि पीडित मुलगी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभिव्योक्ता बांदिवडेकर- पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरला. आणि आरोपी अवधूत यास भादवी कलम ३७६ (२) (आय) आणि पॉस्को कायद्यातील कलम ५ (एम), ६ अन्वये दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भादवी कलम ५०६ अन्वये २ वर्षे कारावास आणि दोन हजार रुपये दंडही ठोठावला. पीडित मुलीच्या आईलाही न्यायालयाने पॉस्को कायद्यातील तरतुदीनुसार दोषी ठरवत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची सर्व रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले.

First Published on June 27, 2019 1:43 am

Web Title: ten years rigorous imprisonment for accused in minor girl raped case zws 70
Just Now!
X