भीमा कोरेगाव इथं झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक भागासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.शहरातील उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात तणावाची परस्थिती निर्माण झाली होती. राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी फिक्स पॉईंट लावले असून आता सगळी परस्थिती नियंत्रणात आहे. सर्व परस्थितीवर आयुक्त यशस्वी यादव नजर ठेवून आहेत.

दरम्यान, परभणीतही संध्याकाळच्या सुमारास काही तरुणांनी दगडफेक करत बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांनी तातडीनं दुकाने बंद केली. मात्र थोड्या वेळाने ती दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली.
परभणीत या घटनेचा सर्व आंबेडकरी संघटनाकडून निषेध करण्यात आला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यलयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भातले एक प्रसिद्धी पत्रकच काढण्यात आले आहे. भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभास अभिवादन करताना तणाव निर्माण झाला आणि दगडफेकीचीही घटना घडली ज्याचे पडसाद मराठवाड्यातही बघायला मिळाले.