गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा, वेरावळ इत्यादी भागांमध्ये खलाशी म्हणून काम करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना गुजरातच्या नारगोळ बंदरात उतरू न दिल्याने जिल्ह्यातील खलाशी समुदायांमध्ये तसेच राज्याच्या सीमा भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

गुजरातच्या वेरावळ भागत कार्यरत असणारे सुमारे दोन हजार खलाशी 4 एप्रिल रोजी आपल्या घरी परतण्यासाठी गुजरातमधील भागत आले होते. या प्रवाशांना प्रथम गुजरातमधील स्थानिकांनी उतरण्यास मज्जाव केला, नंतर 5 एप्रिल रोजी गुजरातमधील 1125 खलाशांना उतरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील खालाशाना उतरवण्यास गुजरात प्रशासकीय विभागाने नकार दिला. पुढे रात्रीच्या वेळी बंदरांमध्ये नांगरलेल्या बोटींचे दोर कापून तसेच गोळीबार करण्याची धमकावणी दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातील 800 खलाशी असणाऱ्या बोटीला नाईलाजाने वेरावळ येथे परतावे लागले.

या खलाशांनी आपल्या नातेवाईकांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये वेरावळमध्ये आपली व्यवस्थित सोय होत नसल्याची तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे नारगोळ बंदरापासून आपली गाव अवघे दोन-तीन किलोमीटरवर असताना आपल्याला तेथे उतरून न दिल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे गुजरात सरकारने राज्यातील खलाशांशी दुजाभवाने वागवले तसेच तलासरी व डहाणू तालुक्यातील आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यक पाठपुरावा केला नसल्याची खंत तलासरी तालुक्यातील मंडळी करीत आहेत. आगामी काळात गुजरातमधील नागरिकांना आपल्या भागातील बाजारपेठेमध्ये येण्यास मज्जाव करू अशा स्वरूपाचा इशारा वेरावळ येथे अडकून पडलेल्या खलाशांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमा भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.