सागरी नियमांचा भंग करणाऱ्या या परप्रांतीय मच्छीमार नौकांच्या विरोधात हर्णेतील मच्छीमारांनी केलेल्या आंदोलनानंतर आता स्थानिक मच्छीमार नौकांच्या विरोधात परप्रांतीयांनीही एकत्रितपणे मोहीम उघडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील वातावरण तंग झाले असून या प्रकरणी मत्स्य खात्याने गांभीर्याने मध्यस्थी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
किनाऱ्यापासून ठरावीक अंतराच्या आत परप्रांतीय नौकांनी मच्छीमारी करू नये, असा मत्स्य खात्याचा नियम आहे. पण असे असतानाही अनेक परप्रांतीय मच्छीमारी नौका स्थानिक मच्छीमारी हद्दीत प्रवेश करतात. अशा मोठय़ा नौकांमध्ये मासे पकडण्यासाठी पर्सोनेट जाळी वापरली जात असल्याने मासळीचा मोठा साठा एकाच वेळी पकडणे त्यांना शक्य होते. एवढी मासळी पकडण्यासाठी स्थानिक मच्छीमार नौकांना तब्बल एक महिना लागतो. साहजिकच या परप्रांतीय नौकांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छीमारांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणून रविवारी हर्णेतील मच्छीमारांनी एक दिवस नौका बंद ठेवून संघटितपणे परप्रांतीय नौकांना पकडण्याचे आणि त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचे ठरवले. त्यानुसार हर्णेतील तब्बल अडीचशे नौकांनी धडक मोहीम राबवून एका परप्रांतीय नौकेला किनाऱ्यावर पकडूनही आणले. कर्नाटक राज्यातील भटकळ येथील सुरेश कुंदर यांची ही नौका आहे. मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सागरी नियमभंग करणाऱ्या या नौकेचा पंचनामा करून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईदेखील केली. तसेच नौकेवरील मासळी साठाही हर्णे बंदरात लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या साठय़ाची किंमत दोन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
मात्र या मोहिमेनंतर किनारपट्टीवरील स्थानिक विरुद्ध परप्रांतीय वाद चिघळला असून परप्रांतीय मच्छीमारांनी स्थानिक नौकांच्या विरोधात समुद्रातच संघटितपणे मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे हर्णेतील दहा ते बारा स्थानिक मच्छीमार नौकांचा तब्बल पन्नास परप्रांतीय नौकांनी सोमवारी पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी जयगड बंदर गाठले. या पाठलाग प्रकरणामुळे हर्णेसह सर्वच बंदरांतील मच्छीमारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी मत्स्य खात्याने त्वरित ठोस कारवाई करावी, असे आदेश आमदार संजय कदम यांनी दिले आहेत. मात्र याबाबत शासनाने उदासीनता दाखवल्यास परप्रांतीयांविरोधातील आंदोलन चिघळण्याचे संकेत स्थानिक मच्छीमार नेत्यांकडून मिळत आहेत.