25 May 2020

News Flash

महायुतीतील तणावामागे सांगलीतील दोन मतदारसंघांचीही भूमिका

महायुतीमध्ये निर्माण झालेल्या टोकाच्या पेचाला सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ आणि पलूस-कडेगाव या दोन मतदार संघावरील भाजपाचा आग्रह कारणीभूत असल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली

| September 23, 2014 02:10 am

महायुतीमध्ये निर्माण झालेल्या टोकाच्या पेचाला सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ आणि पलूस-कडेगाव या दोन मतदार संघावरील भाजपाचा आग्रह कारणीभूत असल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्राचे लक्ष महायुतीच्या अस्तिवाकडे लागले असून जर महायुती जागा वाटपाच्या मुद्यावरून तुटली तर सांगलीमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा नव्या वळणावर जाण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे घर सोडून अथवा गृहत्याग करण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या नेत्यांमध्ये बेघर होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.
पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि गृहमंत्री आर. आर. पाटील या दोघांच्या अनुक्रमे पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघाच्या जागा यापूर्वीच्या युतीतील जागा वाटपाच्या धोरणानुसार शिवसेनेच्या वाटय़ाला आहेत. शिवसेनेने सांगली जिल्ह्यातील वाटय़ाला असणाऱ्या पाचही जागा सोडण्यास नकार दर्शविला असून दुसऱ्या बाजूला भाजपाला जागा वाढवून देण्याचीही तयारी नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसला रोखण्यात यश मिळविले. भाजपाच्या या यशामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपाच्या नेत्यांनी दिला आहे.
जतची उमेदवारी प्रकाश शेंडगेंना द्यायची की जगताप यांना हा पक्षाचा प्रश्न असल्याने याठिकाणी सध्या फारशी अडचण नाही. मात्र शिवसेनेच्या वाटय़ातून पलूस व तासगाव येथील जागा अगोदर भाजपाला मिळविणे हाच प्रश्न भाजपा-सेना यांच्यातील संघर्षांला कारणीभूत ठरला आहे.
गेल्या आठवडय़ात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कवठय़ाला मेळावा घेऊन श्री. घोरपडे यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एका अर्थाने निवडणुकीचा प्रचार शुभारंभ भाजपाने केला असला तरी नव्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे तासगाव व पलूस मतदारसंघामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूला ज्या पक्षातून ही मंडळी बाहेर पडली त्या राष्ट्रवादीतही आघाडीबाबत शंकास्पद स्थिती निर्माण झाल्याने घर सोडून बेघर होण्याची धास्ती या पक्षांतर करणाऱ्या आणि पक्षांतराच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 2:10 am

Web Title: tension in mahayuti
Next Stories
1 मराठवाडय़ात सर्व जागांवर उमेदवारीस सज्जता – दानवे
2 निवडणूक कामात टाळाटाळ, आचारसंहिता भंगाचे सहा गुन्हे
3 अडीच कोटींची अपसंपदा; दोघा अभियंत्यांना अटक
Just Now!
X