जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) या शाळेतील लैंगिक छळप्रकरणी यवतमाळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर्डानगरमध्ये आज पुन्हा संतप्त पालकांचा जमाव जमला.
लैंगिक छळाप्रकरणी नागरिकांनी आजही आक्रमक रुप धारण केले आहे. शनिवारी दोन शिक्षकांना अटक झाल्यानंतर पालकांनी आता संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या अटकेची मागणी करत मोर्चा काढला आहे. दर्डानगरमध्ये संतप्त जमावाने आज काँग्रेस नेते विजय दर्डा यांच्या विकासकामांच्या फलकांची तोडफोड केली. दर्डा यांच्या नावाचे फलक शहरात जेथे जेथे आहेत तेथे तेथे जमावाने जाऊन फलकतोडो आंदोलन सुरू केले आहे. रस्त्यावर टायरही पेटवून देण्यात आले. त्यानंतर या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यावेळी बेभान जमावाने दगडफेक करत पोलिसांबरोबर झटापटही केली. बिथरलेल्या जमावाला नियंत्रण आणण्याकरता पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यवतमाळ शहरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, शनिवारीदेखील येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवंगत जवाहरलाल दर्डा यांचा शनिवारी जन्मदिन असताना संतप्त जमाव प्रेरणास्थळावर चाल करून गेल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. कडक बंदोबस्त असूनही नागरिकांच्या उद्रेकाला आवर घालणे कठीण जात होते. नागरिकांचा हा उद्रेक सुरू असतानाच भाजपचे आमदार मदन येरावार तेथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे काय, असे नागरिकांनी त्यांना खडसावल्यावर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मग भ्रमणध्वनीतील ध्वनिक्षेपक सुरू करून मुख्यमंत्र्यांचे बोलणे साऱ्या नागरिकांना ऐकवले.