संख्याबळ तुलनेने वाढले असल्याने महापौरपद मिळावे, या साठी भाजपने तयारी सुरू केली आहे. खासदार चंद्रकांत खैरे व आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापौरपदाच्या प्रस्तावाची बुधवारी देवाण-घेवाण झाली. भाजपने दिलेला प्रस्ताव शिवसेनेने साफ फेटाळून लावला. या विषयावर वरिष्ठ निर्णय घेतील, असेही त्यांना सांगण्यात आले. बठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांचा सहभाग होता.
महापौरपदासाठी अडीच वर्षांंचा कालावधी युतीत वाटून घेतला जावा व त्यात भाजपला पहिला मान मिळावा, असाही प्रस्ताव देण्यात आला. तोही शिवसेनेच्या नेत्यांना मान्य नाही. शिवसेनाच ‘मोठा भाऊ’ असल्याचे सांगत संपूर्ण पाच वष्रे महापौरपद सेनेकडेच राहील, असे खासदार खैरे यांनी बठकीत सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठक झाल्याच्या वृत्तास खैरे यांनी दुजोरा दिला. मात्र, या बाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे ते म्हणाले.
महापालिकेत शिवसेनेला २८, तर भाजपला २२ जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने करावयाची तडतोड सुरू असतानाच युतीत कुरघोडी करता येते का, याची चाचपणीही सुरू झाली आहे. महापौरपदाची निवडणूक २९ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वीच बंडखोरांना  आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपने ५ बंडखोर आपल्या बाजूने वळविले आहेत. त्यात शिवसेनेतील नाराजही सहभागी होतील, असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. शिवसेनेवर नाराज असणारे गजानन बारवाल यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. शिवसेनेकडूनही जुन्या कार्यकर्त्यांना जवळ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. निवडून आलेल्या किशोर नागरे यांची पत्नी स्वाती, ज्ञानेश्वर जाधव, स्मिता घोगरे, रुपचंद वाघमारे, कैलास गायकवाड यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रिपब्लिकन डेमोक्रॅटिकच्या दोन नगरसेवकांना बरोबर घेण्याचेही सेनेने ठरविले आहे.
दरम्यान, महापौरपदासाठी सुरू असणाऱ्या रस्सीखेचीत शिवसेनेतील ४ नगरसेवकांची नावे चच्रेत आहेत. शिवसेनेकडून विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे आणि राजू वैद्य यांचे नाव पुढे केले जात आहे. या प्रत्येकाने महापौरपद निवडणुकीसाठी प्रत्येकी दोन नामनिर्देशन पत्रे शुक्रवारी घेतली. भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक भगवान घडामोडे यांनीही चार नामनिर्देशन पत्रे घेतली. उद्या (शनिवारी) सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान नामनिर्देशनपत्र वितरीत केली जातील, तर सायंकाळी पावणेसहापर्यंत ती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
बहुमताचा ५७ आकडा गाठताना महापौरपदासाठी कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेतील अपक्ष भाजपच्या गळाला लागतात का, याची चाचपणी सुरू आहे. काहींचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचीही माहिती पुरवली जात आहे. मात्र, शिवसेनेकडूनही तशीच रणनीती ठरविली जात आहे. अपक्षांच्या नाकदुऱ्या काढतानाच भाजपबरोबर नगरसेवक जाऊ नयेत, या साठीही सेना नेत्यांना प्रयत्न करावे लागत आहेत. काही अपक्ष मुस्लिम नगरसेवकही भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, तो पूर्णत: खोटा असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
आमदार अतुल सावे
भाजपचे संख्याबळ वाढले आहे. ताकदही वाढली आहे. त्यामुळे महापौरपदाचा पहिला मान भाजपला मिळावा. महापौर पदाचा पाच वर्षांचा कालावधी विभागून अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावा, यावरही चर्चा झाली. आम्ही आमचे प्रस्ताव शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहेत.
खासदार चंद्रकांत खैरे : संख्याबळ वाढल्याचे ते सांगत असले, तरी शिवसेनाच मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना महापौरपद देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तरी या अनुषंगाने वरिष्ठ निर्णय घेतील. बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. कोणताही ताण नव्हता.