दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत फक्त पाठय़पुस्तकातील प्रश्न देण्याचे धोरण यंदा माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने बदलले असून यंदा ४० पकी ११ गुणांचे प्रश्न पाठय़पुस्तकाबाहेरील असणार आहेत. मात्र ही काठीण्यपातळी वाढवितानाच पर्यायी उत्तरं आणि गाळलेल्या जागा भरा अशा प्रश्नांच्या समावेशाने परीक्षेतील सोपेपणाही वाढविल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गणित विषयाच्या नवीन प्रश्नपत्रिका स्वरूपाचे परिपत्रक सहामाहीनंतर आल्याने सर्व शाळांत प्रिलीम परीक्षाच पहिल्यांदा या स्वरूपात घेतली जाणार आहे.

मुळात दोन वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेत बीजगणितऐवजी सामान्य गणित विषयाचा पर्याय हद्दपार करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसमोर गणित उत्तीर्णतेचे आव्हान निर्माण झाले होते. पण या कालावधीत ४० पकी ८ गुणांचे प्रश्न नववी इयत्तेतील देऊन परीक्षा मंडळाने परीक्षा सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण एकाच वेळी दोन वर्षांच्या पाठय़पुस्तकांचा अभ्यास करणे ही विद्यार्थी आणि पालकांसाठी नवीन डोकेदुखी ठरली. त्यामुळे हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यंदा पुन्हा बदलले. विशेष म्हणजे हा नवीन बदलाचा निर्णय यावर्षी जुल महिन्यात झाला असून या प्रश्नपत्रिका स्वरूपाविषयी सर्व शाळांना सहामाहीनंतर परिपत्रक प्राप्त झालेले आहे. यंदा प्रश्नपत्रिकेत ४० मधील २९ गुणांचे प्रश्न पाठय़पुस्तकातील राहणार आहेत, तर उर्वरित ११ गुणांचे प्रश्न पाठय़पुस्तकाबाहेरचे असतील. यापूर्वी प्रश्नपत्रिकेतील शंभर टक्के प्रश्न पाठय़पुस्तकावर आधारण्यात येत होते.

याविषयी माहिती देताना दापोलीच्या ए. जी. हायस्कूलचे गणित शिक्षक जीवन कदम यांनी सांगितले की, यंदापासून गणित प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल होणार असून गणिताच्या शेवटच्या दोन प्रश्नांमध्ये हुशार विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. मात्र पहिल्या दोन प्रश्नांचे स्वरूप पर्यायी, गाळलेल्या जागा भरा असे असल्याने सामान्य विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा जाण्यास मदत होणार आहे.

मार्गताम्हाणे येथील वसंतराव भागवत विद्यालयाचे गणित शिक्षक प्रताप सुर्वे यांनी नवीन प्रश्नपत्रिका स्वरूपाविषयी माहिती देताना सांगितले की मंडळाने दहावीच्या गणित विषयातील काठीण्य पातळीत समतोल आणला आहे. यंदा सोपे आणि मध्यम प्रश्नांचे प्रमाण प्रत्येकी ४० टक्के आणि कठीण प्रश्नांचे प्रमाण २० टक्के राहणार आहे.

कोल्हापूरचे गणित शिक्षक सागर वटकर यांनी याविषयी सांगितले की, ज्ञान, आकलन, उपयोग आणि कौशल्य अशा चतु:सूत्रीनुसार दहावीच्या गणित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन यंदा केले जाणार आहे. यंदा अ‍ॅप्लिकेशन आधारित २० टक्के प्रश्न विचारण्याचे निश्चित धोरण परीक्षा मंडळाने ठरविले आहे. अशा प्रकारचे धोरण यंदा प्रथमच राज्यातील परीक्षा मंडळाने घेतले आहे.

..तर गणित आणखी कठीण!

दरम्यान, सीबीएसईच्या दहावीच्या गणित परीक्षेचे स्वरूप कालबद्ध रीतीने बदलले जाणार असून त्यात पुढील चार वर्षांत प्रश्नपत्रिकांचे स्वरूप शंभर टक्के अ‍ॅप्लिकेशन आधारित करण्याचा प्रस्ताव आहे. सीबीएसई परीक्षेत असा बदल झाल्यानंतर एसएससी मंडळालाही त्या दृष्टीने विचार करावा लागेल, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू आहे.