पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, या हेतूने निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून तेरणा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प सोडला. हा संकल्प आता तडीस जात असल्यामुळे गावकऱ्यांत समाधान असून भविष्यात पाणीटंचाईवर कायमची मात होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
औराद शहाजनी ते वांजरखेडा असे तेरणा नदीचे ४ किलोमीटर पात्र रुंदीकरण व खोलीकरण करण्याचा संकल्प आर्ट ऑफ लिव्हींगच्या सहकार्याने केला. या कामासाठी सव्वाकोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. ८० मीटर रुंद, २ ते ३ मीटर खोल असे कामाचे स्वरूप आहे. आर्ट ऑफ लिव्हींगने जितका लोकसहभाग जमा होईल तितका निधी देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ लाखांचा लोकसहभाग जमा झाला. दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय २ लाख, महाराष्ट्र विद्यालय दीड लाख, सुभाष मुळे ५१ हजार, प्रेमचंद बियाणी ५१ हजार, जुगल बियाणी (हैदराबाद) ५१ हजार, पूरणमल बियाणी ५१ हजार, आदेप्पा हुलसुरे (हैदराबाद) १ लाख, शंकर पाटील दलाल (हैदराबाद) १ लाख अशा मोठय़ा देणग्यांसह गावातील अनेकांनी यात ५०० रुपयांपासून सहभाग देऊ केला.
दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, नदीपात्रातील गाळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने उपसला. पुढील दोन किलोमीटरच्या टप्प्याचे कामही पूर्ण करण्याचा विश्वास आता लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. मूळचे आग्ऱ्याचे व सध्या दुबईत नोकरी करणारे हितेंद्रसिंग यांनी आपला विवाह साधेपणाने करून त्यातील ३ लाख रुपये तेरणा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पाठवले. हितेंद्रसिंग व औरादचे प्रशांत गिरबले हे दोघे अहमदाबाद येथील आयएएमचे विद्यार्थी. दोघेही दुबईत नोकरी करतात. महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या कामासाठी मदत करण्याची कल्पना हितेंद्रसिंग यांनी मांडली. प्रशांत गिरबले यांनी औरादमध्ये चाललेल्या कामाची माहिती देत दिलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च होईल, असा विश्वास दिला व त्यांनी ३ लाख रुपये औरादकरांना पाठवले. ज्यांचा आपण चेहराही पाहिला नाही अशी मंडळी मदत करीत असल्यामुळे कोणत्याही स्थितीत चार किलोमीटरचे काम पूर्ण करायचे, असा चंग औरादवासीयांनी बांधला आहे.
नदीच्या कडेला असलेल्या गावाला दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याही वर्षी नोव्हेंबर महिन्यातच २५ हजार वस्तीच्या गावाला नळाने येणारे पाणी बंद झाले. त्यानंतर आजूबाजूच्या िवधनविहिरीवर गावकऱ्यांना तहान भागवावी लागते. सध्या गावाला दोन टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आपल्या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा या जिद्दीने लोकांनी कामास सुरुवात केली. वरुणराजाने साथ दिली तर औरादकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्यास नक्कीच मदत होईल.