09 March 2021

News Flash

युती नसल्यास शिवसेनेची कसोटी

बुलढाणा मतदारसंघावर सन १९७७ व १९८९ च्या निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव राहिला

प्रबोध देशपांडे, अकोला

बुलढाणा मतदारसंघात सलग चार निवडणुकीत शिवसेनेने यश मिळवले आहे. या विजयात भाजपचाही मोठा वाटा आहेच. मात्र आता भाजप-शिवसेनेतील युतीच्या निर्णयावर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे गणित ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्यास बुलढाण्याचा गड कायम राखण्याचे आव्हान शिवसेनेपुढे राहील.

बुलढाणा मतदारसंघावर सन १९७७ व १९८९ च्या निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव राहिला. २००४ पर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या  मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात तुल्यबळ सामना झाला. प्रतापराव जाधव यांनी डॉ. शिंगणेंचा २८ हजार मतांनी पराभव केला, तर २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णराव इंगळे यांच्यावर ५९ हजार ५७९ मतांनी विजय मिळवला. आता खासदारकीची हॅट्ट्रिक साधण्याच्या उद्देशाने प्रतापराव जाधवांनी तयारी सुरू केली आहे.

गेल्या २० वर्षांत बुलढाण्यात शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्ह्य़ांत शिवसेनेचे दोन आमदार आहेत. प्रतापराव जाधव यांच्यावर संपर्कप्रमुख म्हणूनही जबाबदारी आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासोबत त्यांचे मतभेद असल्याने सेनेत दोन गट पडल्याचे दिसून येते. निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलढाणा जिल्हा परिषद निवडणुकीपासून भाजपशी खासदार जाधव यांचे वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे भाजपनेही तळागाळात पाय रोवून मतदारसंघात बांधणी केली. युतीची चर्चा फिसकटून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास भाजपकडून जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे, दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव सागर फुंडकर, जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे आदींचे नावे चर्चेत आहेत. युती तुटल्यास त्याचा जबर फटका शिवसेनेला बसण्याची चिन्हे असून, जागा कायम राखण्यात पक्ष नेतृत्वाची कसोटी लागेल.

आघाडीमध्ये बुलढाणा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. डॉ. शिंगणे हे शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक डबघाईस आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. इतरही काही कारणांमुळे मधल्या काळात डॉ. शिंगणे सक्रिय नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक लढण्याच्या दृष्टीने त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. महाआघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न असून, रविकांत तुपकरांसाठी स्वाभिमानीने बुलढाण्यावर दावा केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तुपकरांनीही निवडणुकीसाठी संघटन बांधणी केली आहे. त्यामुळे बुलढाण्यात स्वाभिमानीची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकेल. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न असताना त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांना बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी जाहीर करून धक्कातंत्राचा वापर केला. त्यांची उमेदवारी महाआघाडीसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकेल.

बुलढाणा मतदारसंघात मराठा, माळी, दलित, मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. जिल्हय़ातील सिंचन प्रकल्प व राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्राकडून सुमारे पाच हजार कोटींचा निधी मंजूर झाला. सध्या त्याची कामे सुरू आहेत. तीर्थक्षेत्रांना ब दर्जा मिळवून देण्यात खासदार प्रतापराव जाधव यांना यश आले. वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. जिल्हय़ात १०९ वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्ग रखडला आहे. भूसंपादनाचा त्यात अडसर आहे. याशिवाय जिल्हय़ात शेतीचे प्रश्न, वाढत्या शेतकरी आत्महत्या, मोठय़ा उद्योग-व्यवसायाच्या अभावाने बेरोजगारी, दुष्काळ, अपूर्ण सिंचन प्रकल्प, अर्धवट महामार्ग, खारपाणपट्टा आदी प्रश्न कायम आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत हे प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेतील राजकीय चित्र

बुलढाणा                      काँग्रेस

चिखली                      काँग्रेस

मेहकर                        शिवसेना

सिंदखेडराजा            शिवसेना

खामगाव                  भाजप

जळगाव जामोद      भाजप

बुलढाणा मतदारसंघातील  ३७

तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा मिळवून दिला. त्यांच्या विकासासाठी प्रत्येकी ५० लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळाला. विदर्भात नागपूरनंतर बुलढाण्यात सर्वात जास्त निधी सिंचन व राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर झाला. वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाचा आराखडा तयार करून या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहेत. खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, राज्य शासनाकडे भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार निधी खर्च करण्यामध्येही देशातील सर्वोत्तम ३५ खासदारांमध्ये समावेश आहे.  – प्रतापराव जाधव, खासदार, बुलढाणा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 3:02 am

Web Title: test for shiv sena in buldhana lok sabha constituency
Next Stories
1 गूढ आवाजाने वसमतमधील गावे हादरली
2 रवींद्र मराठेंसह महाराष्ट्र बँकेचे तिन्ही अधिकारी दोषमुक्त
3 नारायण राणे काँग्रेसमध्ये परतणार अशी काँग्रेस नेतेच बोंब करतात
Just Now!
X