वसई, विरार शहरांत चिंताजनक स्थिती

वसई :  मार्च महिन्यापासून करोना रुग्णवाढीला तोंड देत असलेल्या वसई-विरार शहरांत एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. या महिन्यात एकूण २० हजार ६७२ रुग्ण आढळले असून १८६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, या महिन्यात करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांतून ५४ टक्के बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या शहरांतील चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

चालू वर्षांच्या सुरुवातीला वसई विरार शहरातील करोना रुग्ण कमी होऊ लागले होते. जानेवारी महिन्यात ५८२ आणि फेब्रुवारी महिन्यात ५७० करोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र मार्च महिन्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. मार्च महिन्यात २ हजार ८१५ रुग्ण आढळले होते. परंतु एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. एकाच महिन्यात शहरात २० हजार ६७२ एवढय़ा विक्रमी रुग्णांची नोंद झाली.  चाचण्यांमध्ये रुग्ण सकारात्मक आढळण्याचे प्रमाणदेखील शहरात सर्वाधिक असल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २९ मार्च ते २९ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत शहरात ३६ हजार ५०३ चाचण्या झाल्या. त्यापैकी २० हजार ११ रुग्ण करोनाबाधित आढळले. म्हणजे रुग्ण सकारात्मक असल्याची टक्केवारी ५४. ८२ टक्के एवढी आहे. रुग्णसंख्या सर्वाधिक असली तरी ११ हजार २३८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या शहरात ११ हजार १५४ रुग्ण उपचार घेत आहेत.

२१ ठिकाणी चाचण्या

वेळीच उपचार व्हावे यासाठी चाचण्या वाढविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.  २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर चाचण्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षणे असलेल्या कुठल्याही नागरिकाची या केंद्रावर थेट गेल्यास चाचणी करण्यात येते. याशिवाय खासगी रुग्णालयातही चाचण्या केल्या जात आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत (२ मेपर्यंत) पालिकेने २ लाख ६३ हजार २१३ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी ५५ हजार ३८९ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.