News Flash

सोलापूरमध्ये वस्त्रोद्योगाने भरारी घेण्यासाठी पंखांचे बळ हवे!

वस्त्रोद्योगाने नव्याने भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ यायला हवे.

येत्या चार वर्षांत सोलापुरात किमान दोन हजार वस्त्रोद्योग केंद्रे सुरू करण्याच्या उद्देशाने देशातील दुसरे गणवेश कापड आणि गृह वस्त्रोद्योग उत्पादन प्रदर्शन २७ ते २९ जानेवारी या तीन दिवसांसाठी सोलापुरात भरणार आहे. वस्त्रोद्योगासाठी सोलापूरचे वातावरण पोषक आहे. शासनाने याच शहरात नवीन वस्त्रोद्योग केंद्रे सुरू करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे. त्याच वेळी हे पाऊल केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ होऊ नये म्हणून येथील वस्त्रोद्योगाशी निगडित प्रश्नांची उकल होण्याची गरज बोलून दाखविली जात आहे. वस्त्रोद्योगाने नव्याने भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ यायला हवे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग अशी खाती सांभाळताना सुभाष देशमुख यांनी सत्तेचा किमान लाभ सोलापूरसाठी मिळायला हवा, या भूमिकेतून त्यांनी येथील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी काय करता येऊ शकेल, यासाठी धडपड चालविली आहे. सोलापुरातील वस्त्रोद्योगासाठी असलेले पोषक वातावरण विचारात घेऊन देशमुख यांच्या पुढाकाराने वस्त्रोद्योग केंद्रांच्या उभारणीसाठी गेल्या वर्षी पहिल्यांदाच सोलापुरात देशपातळीवर गणवेश कापड व गृह वस्त्रोद्योग उत्पादन प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याबाबत पूरक चालना मिळण्याच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात किती पाठपुरावा झाला, हे ठाऊक नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा याच सोलापुरात वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांच्याच पुढाकाराने देशातील दुसरे गणवेश कापड व गृह वस्त्रोद्योग प्रदर्शन हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भरत आहे. सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची कीर्ती जगाच्या पातळीवर पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरीत्या जगातील १९८ भारतीय दूतावासांना आणि भारतातील विविध १६४ देशांच्या दूतावासांना या प्रदर्शनाचे निमंत्रण पाठविले आहे. त्यामुळे येथील वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा व्यक्त होत आहे. तयार कापड आणि गृह वस्त्रोद्योगाचे हे प्रदर्शन सोलापूरच्या विकासाचा पाया ठरावा, अशी अपेक्षा या क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली ती अनाठायी म्हणता येणार नाही.

सोलापूर हे एके काळी गिरणगाव म्हणून ओळखले जायचे. येथील सोलापूर स्पिनिंग अ‍ॅण्ड व्हिव्िंहग कापड गिरणी तर संपूर्ण आशिया खंडात मोठी होती. या कापड गिरणीत तिन्ही पाळ्यांमध्ये मिळून तब्बल २२ हजार कामगार काम करायचे. ६०-६५ वर्षांपूर्वी ही कापड गिरणी बंद पडली आणि सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पहिल्यांदाच फटका बसला होता. त्यानंतर १९९० नंतर जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेमुळे देशातील एकूणच वस्त्रोद्योगाला दारुण अवस्था प्राप्त झाली तशी सोलापुरातील उरल्यासुरल्या कापड गिरण्यांनी अखेरचा श्वास घेतला. तद्पश्चात शहरातील पूर्व भागात यंत्रमागाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग कसाबसा टिकून आहे. काळानुरूप बदलते तंत्रज्ञान आत्मसात करता न आल्याने सोलापुरातील परंपरागत वस्त्रोद्योग मागे पडत राहिला. मोठय़ा नाममुद्रेचे पुण्य पाठीशी असूनही सोलापुरी चादरीचे उत्पादन यापूर्वीच घटले आहे. उलट, हरियाणातील पानिपत व इतर ठिकाणी उत्पादित झालेल्या चादरी ‘सोलापुरी चादरी’ म्हणून येथे विकल्या जातात. अशी ही शोकांकिका असताना टॉवेल उत्पादनावर वस्त्रोद्योग अवलंबून राहिला आहे. मजूर अभिमुख उद्योग म्हणून येथील चादर व टॉवेल उत्पादकांनी शासनाकडून सवलती उकळल्या आहेत; परंतु तंत्रज्ञान न आणल्याने बुडत्या वस्त्रोद्योगाचा पाय खोलात जात आहे. सुमारे ६० हजार कामगारांना रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगाबरोबरच काम करतात. सद्य:स्थितीत सोलापुरात नवीन उद्योगधंदे नसले तरी यंत्रमाग व विडी उद्योगाचा आधार कामगारांना मिळतो आहे. विडी उद्योगही संकटातून जात असल्यामुळे रोजगाराला मर्यादा आहेत. विडी उद्योग बंद पडल्यास पर्यायी रोजगार म्हणून गारमेंट उद्योगाचा आधार हा महत्त्वाचा पर्याय आहे. काळाची पावले ओळखून पूर्व भागातील महिला विडी कामगारांच्या घरातील नवीन पिढी विडी उद्योगाकडे न वळता गारमेंट उद्योगाकडे वळत आहे. आगामी काळात विडी कामगाराची मुलगी ही विडी कामगार ही परंपरा खंडित होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन पिढी विडीऐवजी कापड शिलाईचे प्रशिक्षण घेणे पसंत करीत आहे. दरमहा किमान दोनशे कोटींची उलाढाल होणाऱ्या तयार कपडे उद्योगाला चालना मिळण्यासाठी आता ६० कंपन्यांचे क्लस्टर उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे ६१० कोटी रुपये खर्चाच्या क्लस्टरमधील ८० टक्के गुंतवणूक राज्य सरकारकडून होणे अपेक्षित आहे. प्रत्येकी वार्षिक सुमारे ५० लाखांची उलाढालीची क्षमता असलेली तयार कपडे उत्पादन करणारी ३१० केंद्रे सध्या कार्यरत आहेत. येत्या चार वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत वस्त्रोद्योगाची ही केंद्रे दोन हजारांपर्यंत वाढविण्याचा संकल्प शासनाने सोडला आहे.  शासनाने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा मानला जात असताना त्यातील संबंधित प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. भांडवलाची उपलब्धता, कुशल व कार्यक्षम कामगार आणि निर्यातीला चालना हे तीन महत्त्वाचे मुद्दे असून त्याकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

काही वर्षांपूर्वी सोलापुरात तयार होणाऱ्या तयार कपडय़ांची निर्यात परदेशात होत असे. दुबईत तर एखाद्या बाजारपेठेत चीनच्या उत्पादित तयार कपडय़ांची विक्री दालने हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मर्यादित होती, ती आता शेकडो पटींनी वाढली आहेत. किंबहुना परदेशातील ८० टक्के बाजारपेठ चीनने काबीज केली आहे. निर्यात वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे.

सतीश संगा, निर्यातदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:57 am

Web Title: textile industry issue in solapur subhash deshmukh
Next Stories
1 साप साप म्हणून भुई धोपटायचं थांबवा; रामदास कदमांचा खैरेंना टोला!
2 मुख्यमंत्री राजकीय दहशतवादी; काँग्रेसचा आरोप
3 अहमदनगरमधील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी सहा दोषी
Just Now!
X