राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत आहेत. तुलनेत रूग्णालयांमधील बेड्सची उपलब्धता कमी असल्याने, अनेक रूग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल सुरू आहेत. तर, प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये तर बेड न मिळाल्याने एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांमधून ४-५ तास प्रवास करूनही रुग्णांना बेड्स मिळणं अशक्य झालं आहे. रुग्णांचे होणारे हाल पाहून ठाकरे सरकारने आतातरी काही ‘हाल’चाल करावी.” असं भाजपाने म्हटलं आहे.

तसेच, “ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे राज्यात करोनाचा विस्फोट झालाय… ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासेल अशी भीती व्यक्त होत होतीच. नाशिकमध्ये बाबासाहेब कोळे या करोनाग्रस्ताचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने पत्राद्वारे मांडलेली व्यथा तुमच्या जिव्हारी लागू दे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.” असं देखील भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र आहेत. मात्र राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा त्यांना विसर पडलाय. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, औषधे, बेड्स नाहीत. त्याबद्दल काही ठोस पावलं उचलण्याची तयारी ते करू शकले असते… पण त्यांनी ती केली नाही…! ठाकरे सरकार किती दिवस हा नन्नाचा पाढा?” असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आलेला आहे.

तसेच, “राज्यावर आधीच करोनाचं सावट आहे. त्यात आणखी एक संकट म्हणजे रक्ताचा प्रचंड तुटवडा. ७ ते ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा राज्यात शिल्लक आहे. मात्र हा तुटवडा होईपर्यंत ठाकरे  सरकार काय करत होतं? याचं उत्तर त्यांनी द्यावं.” असा देखील भाजपाने ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, करोना विषाणूची घट्ट होत चाललेली मिठी आणि रुग्णसंख्येचा विस्फोट यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येनं मोठी उसळी घेतल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज(रविवार) राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.