राज्यात करोनाचं संकट असताना दुसरीकडं राजकीय टीका, आरोप प्रत्यारोप जोरात सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. आपत्ती पर्यटन अशी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असा उपहासात्मक अंदाजात टोला लगावला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

विरोधकांकडून महाविकास आघाडीसंदर्भात केल्या जाणाऱ्या आरोपांना व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. ते ‘सीएनएन न्यूज १८’ शी बोलत होते. महाविकास आघाडीसंदर्भातील आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “द्वेष आणि असुरक्षिततेच्या भावनेतूनच विरोधी पक्ष महाविकास आघाडीविषयी ऑक्टोबरमध्ये सरकार कोसळणार असल्याच्या अफवा पेरत आहे. या तर्कामध्ये कसलेही तथ्य नाही. त्या फक्त अफवा आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय आहे,” असं ठाकरे म्हणाले.

“कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनुभवी नाही. पण, असं म्हटलं तर मी प्रौढ आहे. मी प्रत्येकाला मदत करणाऱ्यांसोबत उभं राहिलो आहे. मला अनुभव नसल्याचा आनंदच आहे. कारण माझ्या अनुभव नसण्याचा अर्थच असा आहे की, मी लोकांचा वंश, धर्म, जाती, लिंग, पंथ वा राजकीय रंग न पाहता त्यांच्यासाठी काम करत आहे,” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं.

विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडं कसं पाहता या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मूळात आम्ही हे सगळं पाहत बसत नाही. त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही जे काही करतो त्यावर टीका करायला त्यांना आवडते. परंतु तुम्ही सरकारविरुद्ध (केंद्र सरकार) बोललात, तर मग तुम्ही त्यांच्यासाठी देशद्रोही ठरता. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणं हाच उत्तम मार्ग आहे. हे मानवतेसाठी चांगलं नाही. दुर्दैवानं जग कुठल्या परिस्थितीतून जात आहे, याची जाणीव त्यांना नाही,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला लगावला.