आत्महत्या केलेले  वास्तूरचनाकार अन्वय नाईक यांचा परिवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परिवार या दोन परिवारांमध्ये आर्थिक संबंध आहेत. त्यांनी एकत्रितपणे अनेक जमिनी खरेदी केल्या आहेत. या व्यवहारासंदर्भातील माहिती लपवली जात आहे. असा आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या यांनी शुक्रवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत केला.   ठाकरे आाणि नाईक परिवाराने मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे समुद्रकिनारी जमीन खरेदी केली आहे. डॉ. किरीट सोमैया यांनी शुक्रवारी या जमिनीची पाहणी केली. त्यानंतर ते अलिबागमध्ये पत्रकारांशी बोलत होते.  भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यावेळी उपस्थित होते.

अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अन्वय नाईक यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी , फिरोज शेख व नितेश सारडा यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे या तिघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली होती.

डॉ. किरीट सोमैया यांनी सांगितले की, ठाकरे आणि नाईक परिवाराने एकत्रित अनेक जागा विकत घेतल्या आहेत. त्यांनी कोर्लई येथे जागा खरेदी केली आहे. याबाबत माहिती मागितली असता तलाठी, जिल्हाधिकरी माहिती देण्यास टाळाटळ करीत आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ठाकरे व नाईक परिवारामध्ये झालेल्या जमिन खरेदी व्यवहाराची देखील चौकशी केली पाहिजे. अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी केली.