‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्यासह एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करत मनसेच्या अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेसमोर गुरुवारी थाळीनाद आंदोलन केलं. नवे धरण, सेंट्रल पार्क, मालमत्ता करात सूट, अशा आश्वासनांची पूर्तता कधी करणार? क्या हुआ तेरा वादा? असा प्रश्न मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. पाचशे स्क्वेअर फुटाहून कमी जागेत राहणाऱ्या ठाणेकरांचा मालमत्ता कर रद्द करणार, शिवसेनाप्रमुखांच्या नावे सर्वांना मोफत आरोग्य सुविधा देणार, असा साडेतीन वर्षांआधी उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
” पाचशे स्क्वेअर फुटाहून कमी जागेत राहणाऱ्या ठाणेकरांचा मालमत्ता कर रद्द करणार, शिवसेना प्रमुखांच्या नावे सर्वांना मोफत आरोग्य सुविधा देणार” असं आश्वासन या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

पाचशे फुटात राहणाऱ्या ठाणेकरांचा मालमत्ता कर रद्द झाल्यास ६० टक्के मध्यमवर्गाला दिलासा मिळेल. घन कचऱ्यात छोट्या व्यापाऱ्यांना सूट देण्याचे आश्वासन ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी दिलं गेलं होतं. त्याचं काय झालं? असाही प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारला आहे. ठाणे महापालिकेसमोर आज मनसेने मोठमोठ्याने थाळीनाद करुन आंदोलन केलं यावेळी क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न या आंदोलकांनीही विचारला. तसंच ठाण्यात सेंट्रल पार्कची निर्मिती कधी होणार? नव्या धरणाची निर्मिती कधी होणार? असे प्रश्न विचारणारे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते.