एका महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी ३३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलिसांनी एका कोंबडीच्या पिसाच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळत गुन्ह्यचा उलगडा गेला. गेल्या महिन्यात पोलिसांना टिटवाळा येथील एका गावात ३० वर्षीय महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.

आरोपीचं नाव आलम शेख असून तो टिटवाळ्यात चिकन विक्रेता आहे. ठाणे क्राईम ब्रांचने कोंबडीचं पिस आणि त्याठिकाणी सापडलेल्या ताबिजच्या आधारे आलमचा शोध घेतला. पोलिसांना मृतदेहाशेजारीच दोन्ही गोष्टी सापडल्या होत्या. ताबीजवर बंगाली भाषेत संदेश लिहिलेला होता.

तपासादरम्यान पोलिसांना मृतदेहाशेजारी एक पोतं सापडलं ज्याला कोंबडीची पिसं होती. तसंच मृतदेहाला एक ताबिज बांधण्यात आलं होतं, ज्यावर बंगाली भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं. पोलिसांनी लगेचच परिसरातील बंगाली भाषा येत असणाऱ्या चिकन विक्रेत्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांना महिला ३३ वर्षीय आलम शेख याच्याकडे वारंवार येत असे अशी माहिती मिळाली.

चौकशीदरम्यान पोलिसांना महिलेचा मृतदेह मिळाल्यापासून आलम शेख पश्चिम बंगालला निघून गेला असल्याचंही कळालं. गेल्या अनेक दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. महिला आलमची नेहमीची ग्राहक होती, तसंच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. महिलेने आलमकडून अडीच लाख रुपये उधार घेतले होते. पण परत करत नव्हती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

यामुळेच दोघांमध्ये वाद झाला आणि आलमने गळा दाबून महिलेची हत्या केली. आलमने एका पोत्यात महिलेचा मृतदेह भरला आणि पुरावा मिळू नये यासाठी जाळून टाकला. यासाठी त्याने आपल्या एका मित्राची मदतही घेतली. पोलिसांनी आलमला अटक केली असून, त्याचा मित्र फरार आहे. चौकशीदरम्यान आलमने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.