ठाण्यात खड्ड्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातात ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी घोडबंदर रोडवर हा अपघात झाला. अशोक वाडेकर असं जखमी झालेल्या नागरिकाचं नाव असून ते मानपाडाचे रहिवाशी आहेत. खड्ड्यामुळे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात अशोक वाडेकर यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून, डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. अशोक वाडेकर मानपाडाला जात असताना हा अपघात झाला.

‘मी शुभारंभ टॉवरजवळ असताना गाडीचा वेग कमी केला होता. खड्ड्यातून जात असताना माझा तोल गेला आणि अपघात झाला’, अशी माहिती अशोक वाडेकर यांनी दिली आहे. अशोक वाडेकर यांना गंभीर दुखापत झाली असून चेहरा आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. हेल्मेट घातलं असल्या कारणाने सुदैवाने त्यांच्या डोक्याला जखम झाली नाही.

अशोक वाडेकर यांनी रस्त्याची अत्यंत दुर्देशा झालं असल्याचं म्हटलं आहे. ‘रस्त्याचा तो ठराविक भाग काही आठवड्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. मात्र पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. प्रशासन नेमक्या कशा पद्धतीचं काम करत आहे ? एखाद्याने जीव गमावला तर जबाबदारी कोणाची ?’, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अशोक वाडेकर यांना कुटुंबियांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सुदैवाने त्यांना फक्त डोळ्याखाली जखम झाली आहे. अजून थोडी वर जखम झाली असती तर कदाचित त्यांना डोळा गमवावा लागला असता’.

अशोक वाडेकर यांनी यासंबंधी कोणतीही तक्रार करणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात आवाज उठवला पाहिजे असं आवाहन केलं आहे.