ठाण्यात अनधिकृतरित्या मोबाईल कंपन्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याचे प्रकरण गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींबरोबरच बॉलिवूड अभिनेत्यांचा सहभागही उघड झाला आहे. दरम्यान, आज (दि.१८) झालेल्या ताज्या कारवाईत अशा प्रकारे बेकायदेशीर सीडीआर काढून देणाऱ्या मुख्य सुत्रधाराला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सौरव साहू असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सुत्रधाराचे नाव असून काल रात्री दिल्ली येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आजवर अनेक मोठी नावे समोर आली असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध नावांचाही समावेश आहे. सौरव साहू याने यापूर्वीही अशाच प्रकारे अवैधरित्या सीडीआर काढण्याचे काम केले असून यापूर्वी दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. भारतामध्ये पोलिसांची परवानगी असल्याशिवाय सीडीआर काढता येत नाही. त्यामुळे अवैधरित्या कोणाच्याही फोन कॉल्सची माहिती मिळवल्यास तो गुन्हा ठरतो.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीडीआर प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बेकायदा लोकांचे सीडीआर काढल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत डझनभर लोकांना अटक केली आहे. यामध्ये भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश होता, त्या सध्या जामीनावर बाहेर आहेत. त्यानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या पत्नीचा सीडीआर मिळवून देण्यात मदत करणारा वकिल रिझवान सिद्दीकी याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ आणि कंगना रणौत यांच्याही नावाचा सीडीआर काढल्याप्रकरणी यात उल्लेख होता. त्याचबरोबर अभिनेत्री उदिता गोस्वामी हीचा देखील यात समावेश होता.

मात्र, आता या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार ताब्यात आल्यानंतर त्याच्याकडील चौकशीनंतर अाणखी महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.  यात अनेक खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.